नागपूर: इस्लामिक आतंकवादाच्या पाठीमागे त्यांच्या संघटनांमधून सध्या पसरवल्या जात आहे एक संकल्पना जिचं नावं आहे गझवा-ए-हिंद. सध्या पाकिस्तानात गझवा-ए-हिंदवर भाषणे अगदी जोरदार सुरू आहेत. मात्र, झपाट्याने ह्या संकल्पनेला जिवंत करण्याचा हा जो आतंकवादी प्रयत्न आहे तो किती घातक आहे हे सर्वानीच समजणे गरजेचे आहे.
गझवा ए हिंद... अर्थात भारतावर ताबा मिळवण्यासाठीचं युद्ध, अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या आयसिसचं अर्थात वहाबींचं पुढचं लक्ष्य आणि त्यासाठीच तरुणांच्या फौजा उभारण्याचं काम सुरु आहे. अगदी तुमच्या-आमच्या आजूबाजूच्या मुस्लिम तरुणांना आकर्षित करण्यासाठी पद्धतशीर जाळं टाकण्यात आलं आहे.
अगदी शिकल्यासवरलेल्या तरुण-तरुणींना आकर्षित करण्यासाठी इंटरनेटचाही वापर करण्यात येत आहे. फक्त मग, टी शर्टच नाही तर लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या टेडी बिअर्सनाही गझवा ए हिंदनं जवळ केलं आहे. त्याशिवाय प्रत्येक स्टॉलवर तरुणांची डोकी फिरवणारी, त्यांना भडकवणारी पुस्तकं मिळतात ती वेगळीच बाब.
भारतात जसं झाकीर नाईक पोरांची डोकी भडकवतो, पाकिस्तानमध्ये हे काम झायद हमीद करतो. यू ट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल नेटवर्किंगमधून तरुण पोरांना जिहादच्या नावानं जाळ्यात ओढण्याचं काम सुरु आहे. कधीकाळी स्पेन आणि भारतावर आपण राज्य केलं आहे आणि आता आपल्याला इथं गुलामासारखं का राहावं लागतं आहे? असा युक्तीवाद केला जातो आहे..
कुराण आणि इस्लाममध्ये हिंसेला स्थान नाही. पण आपल्या फायद्यासाठी आयसिस, लष्कर ए तोयबासारख्या संघटनांनी त्याचा खुबीनं वापर चालवला आहे. त्यासाठी इंटरनेटचा वापरही वेगानं होतो आहे. दरदिवशी किती मुस्लिम तरुणांची दिशाभूल होते आहे हे समजणं शक्य नाही.