नमाज पठण करताना बांगलादेशात स्फोट, दोघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 07 Jul 2016 06:20 AM (IST)
ढाका : बांगलादेशमध्ये ईदगाह मशिदीजवळ मुस्लिम धर्मीय नमाज पठण करत असताना बॉम्बस्फोट झालाय. या हल्ल्यात एका पोलिस कर्मचाऱ्यासह दोघांचा मृत्यू झाला असून 11 जण गंभीर जखमी आहेत. किशोरगंजमधील शोलाकिया भागात ईदगाह मैदानावर शेकडो मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी हजर झाले असताना कोणीतरी बॉम्ब फेकला. स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. यावेळी तीन ते चार लाख मुस्लीम नागरिक नमाजासाठी उपस्थित असल्याची माहिती आहे. गेल्याच आठवड्यात ढाक्यातल्या रेस्टॉरंटमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हा बांगलादेशातला दुसरा मोठा हल्ला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार कालच आयसिसनं बॉम्बस्फोट घडवणार असल्याची धमकी दिली होती. मात्र हा दहशतवादी हल्लाच आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.