मुंबई:  पंतप्रधान नरेंद्र मोदी चार आफ्रिकी देशांच्या पाच दिवसीय दौऱ्यासाठी आज रवाना झाले. मोदींच्या या यात्रेचा उद्देश अफ्रिकी देशांचे भारतासोबतचे आर्थिक तथा सामरीक संबंध मजबूत व्हावेत, यासाठी या दौऱ्याची आखणी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी आपल्या पाच दिवसीय दौऱ्याची सुरुवात मोजाम्बिकमधून करणार आहेत. त्यानंतर ते दक्षिण आफ्रिका, तंजानिया आणि केनिया या देशांमध्ये जाणार आहेत.

 

या यात्रेदरम्यान हायड्रोकार्बन, सागरी सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, कृषी आदी क्षेत्रात सहकार्यावर त्यांचा भर असेल. भारत आणि आफ्रिकेसोबतचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी या दौऱ्याचे महत्त्व असून या यात्रेतील मोजाम्बिकची भेट त्यासाठी महत्त्वाची आहे., असे पंतप्रधानांनी ट्विट करून सांगितले. दक्षिण आफ्रिकेतीलमधील प्रिटोरिया, जोहान्सबर्ग, डरबन ते पीटर मारित्जबर्ग आदी ठिकाणी ते भेट देणार असल्याचे सांगितले.

 

तंजानियाचे राष्ट्रपती डॉ. जॉन मागुफुलीस सोलर मामाज यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील केनियाच्या भेटीसंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे की, ''माझ्या केनियाच्या यात्रेदरम्यान राष्ट्रपती यू केन्याटा यांच्यासोबत आर्थिक मुदद्यांवर चर्चा करणार असून, दोन्ही देशातील संबंध अधिकच वृद्धिंगत होण्यावर भर असेल.'' या दौऱ्याची माहिती त्यांनी फेसबुकच्या माध्यमातूनही दिली आहे.

 

पंतप्रधानांनी दक्षिण आफ्रिकेला महत्त्वाचा राजकीय सहकारी असल्याचे सांगून या भेटीने दोन्ही देशांचे संबंध अधिकच वृद्धिंगत होतील, असे सांगितले आहे. तसेच मोदींनी दक्षिण आफ्रिकेची भेट ही आपल्यासाठी ऐतिहासिक असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, ''दक्षिण आफ्रिकेतील महात्मा गांधींच्या वास्तव्याच्या काळात येथील परिस्थितीमुळे त्यांच्यावर मोठा परिणाम केला. ते दक्षिण आफ्रिकेत एक वकील म्हणून गेले, पण भारतात परतताना ते मानवतेचा बुलंद आवाज बनूनच आले. भारता परतल्यानंतर त्यांनी येथील मानव जातीला आकार देण्याचे काम केले.''

 

या दौऱ्यावेळी फीनिक्स सेटलमेंट आणि पीटरमारित्जबर्ग या दोन्ही रेल्वे स्थानकांना भेट देणार असून ही भेट आपल्यासाठी अविस्मरणिय क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेतील दौऱ्यात नेलसन मंडेला यांना श्रद्धांजली वाहिल्याशिवाय हा दौरा अपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

 

दक्षिण आफ्रिकेतील यात्रेदरम्यान ते राष्ट्रपती जैकब जुमा आणि उपराष्ट्रपती साइरिल रामाफोसा यांची भेट घेणार आहेत. 10 जुलै रोजी ते तंजानियाच्या दौऱ्यावर जाणार असून तेथून ते केनियाला जातील