मॅड्रिड/ स्पेन : स्पेनच्या कोर्टाने बलात्काराच्या प्रकरणात दिलेला निकाल ऐकून सगळेच न्यायपालिकेला शिव्यांची लाखोली वाहात आहेत. कारण, एका 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार होऊन पण, कोर्टाने तो अमान्य करुन शिक्षा सुनावण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे स्पेनमधील नागरिक रस्त्यावर उतरुन न्यायपालिकेविरोधात निदर्शनं करत आहेत.


मीडिया रिपोर्टनुसार, दोन वर्षापूर्वीचं हे प्रकरण आहे. एका 18 वर्षीय तरुणीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. विशेष म्हणजे, याचा व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरलदेखील केला होता. ही घटना स्पेनमधील बहुचर्चित बुल फेस्टिव्हलदरम्यान घडली होती.

स्पेनमधील स्थानिक वृत्तपत्रानुसार, व्हायरल झालेल्या व्हिडीओत, तरुणीचे डोळे बंद होते, आणि ती बेशुद्ध अवस्थेत होती. आरोपींच्या वकिलाने याचाच फायदा घेत हा बलात्कार नसल्याचा कोर्टात युक्तीवाद केला.

त्यामुळे कोर्टाने हा बलात्कार असल्याचे अमान्य केले. पण लैंगिक शोषण प्रकरणात पाचही आरोपींना 9 वर्षांची शिक्षा आणि पीडितेला प्रत्येकी 8-8 लाखाची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. पण कोर्टाने आरोपींना 22 वर्षांची शिक्षा सुनावावी अशी मागणी, पीडितेच्या वकिलाने केली होती.

सध्या स्पेनमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपी घटनेवळी हिंसक झाला होता, आणि तो अतिशय भितीदायक कृती करत होता, हे पीडितेला कोर्टात सिद्ध करावे लागते. दरम्यान, कोर्टाच्या निकालानंतर स्पेनमध्ये एक ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. या याचिकेत विद्यमान न्यायमूर्तींना हटवण्याची मागणी होत आहे.