नवी दिल्ली : सप्टेंबरमध्ये रशियात होणाऱ्या राष्ट्रीय युद्ध सरावात भारत आणि पाकिस्तान हे दोन प्रतिस्पर्धी देश सहभागी होणार आहेत. दहशतवादी कारवायांना चाप बसवण्यासाठी आयोजित या युद्ध सरावात चीनसह अनेक देश सहभागी होणार आहे.


शांघाय सहयोग संघटना (एससीओ)कडून याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या संस्थेवर चीनचं प्रभुत्व असल्याने त्याची ‘नाटो’शी तुलना केली जात आहे. या युद्ध सरावाचे आयोजन उराल भागात होणार असून, एससीओमधील सर्व सदस्य देश यात सहभागी होतील.

दहशतवादाचा सामना करण्यासाठी एससीओच्या आठ सदस्य देशांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यावर विशेष भर असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गेल्या आठवड्यात बीजिंगमध्ये एससीओ सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमणदेखील उपस्थित होत्या. त्यांनीही सैन्य अभ्यासाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सीतारामण यांनी सांगितलं की, “स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानसारखे दोन प्रतिस्पर्धी देश युद्ध सरावात सहभागी होणार आहेत.” पण दुसरीकडे दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्राच्या शांती रक्षा मिशनमध्येही काम केलं आहे.

रशिया, चीन किर्गिज गणराज्य, कझाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखांनी 2001 मध्ये शांघायमध्ये आयोजित शिखर परिषदेत एससीओची स्थापना केली. 2005 मध्ये भारत आणि पाकिस्तान हे देश पर्यवेक्षक म्हणून या संघटनेत सहभागी झाले.

या संघटनेत भारताने सदस्यत्व स्विकारण्यासाठी रशियाने, तर पाकिस्तानच्या सदस्यत्वासाठी चीनने पुढाकार घेतला होता.