Elon Musk on EVM : टेस्ला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (जुने ट्विटर) प्रमुख एलाॅन (Elon Musk) यांनी पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवरून (EVM) हल्लाबोल केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (जुने ट्विटर) वर एका पोस्टमध्ये मस्क यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन आणि पोस्टल मतदान धोकादायक असल्याचे म्हटले आहे. आपण फक्त कागदी मतपत्रिका आणि वैयक्तिक मतदान अनिवार्य केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. मस्क यांनी गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएम विरोधात भूमिका घेतली आहे. 






मस्क यांचा ईव्हीएमला कडाडून विरोध 


जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये गणले जाणारे अब्जाधीश उद्योगपती मस्क (Elon Musk on EVM) यांनी गेल्या महिन्यात ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर हा मुद्दा भारतात चांगलाच तापला होता. कारण म्हणजे भारताने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे स्वीकारली आहेत आणि मस्क यांची ईव्हीएमवर पूर्वीची प्रतिक्रिया देशात लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाच आली होती.


मस्क यांनी अनेक बातम्या शेअर केल्या


ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करताना, एलोन मस्क यांनी एक्सवर पोस्ट केले आणि काही बातम्यांचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले. शेअर केलेल्या या स्क्रीनशॉट्समध्ये जुन्या सॉफ्टवेअरवर चालणाऱ्या मतदान यंत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून त्यात छेडछाड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इलॉन मस्क यांनी गेल्या महिन्यात कोणतीही ईव्हीएम यंत्रणा हॅक केली जाऊ शकते, असे म्हटले होते.






अमेरिकन ईव्हीएमबाबत मस्क यांचा प्रश्न


या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी इलॉन मस्क अमेरिकन व्होटिंग मशीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्याचवेळी त्यांच्या प्रश्नांचा परिणाम भारतातही दिसून आला. मस्क यांच्या नव्या प्रतिक्रियेमुळे हा मुद्दा पुन्हा तापू शकतो.