मुंबई: मूळचा दक्षिण सुदान या देशातील असलेल्या न्हियाल डेंगला (Nhial Deng) पहिले ग्लोबल स्टुडंट प्राईज (Global Student Prize) जाहीर करण्यात आलं आहे. निर्वासितांच्या शिक्षणासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन त्याला 83 लाख रुपयांचा हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी जगभरातून एकूण 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये भारताच्या रविंद्र बिष्णोईचेही नाव होतं. पण न्हियाल डेंगने बाजी मारली. युनेस्को आणि लंडनमधील वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या ग्लोबल टीचर अवॉर्डच्या धर्तीवर ग्लोबल स्टुडंट प्राईज सुरू करण्यात आला आहे.  


 






कोण आहे न्हियाल डेंग? (Who Is Nhial Deng)


न्हियाल डेंग (Nhial Deng) हा मूळचा दक्षिण सुदान या देशातला. त्या ठिकाणी नेहमीच युद्धजन्य परिस्थिती. त्यामुळे  न्हियाल डेंगच्या वडिलांनी तो देश सोडला आणि ते इथिओपियाला गेले. नंतर केनियातील एका निर्वासितांच्या शिबिरात गेल्यानंतर त्याला शिक्षणाची संधी मिळाली. आजूबाजूची परिस्थिती पाहता शिक्षणाच्या माध्यमातून चांगले भविष्य घडविण्याचा निर्धार  न्हियाल डेंगने केला.


वयाच्या 16 व्या वर्षी न्हियाल डेंगने, हायस्कुलमध्ये जर्नालिझम क्लबची स्थापना केली. निर्वासित शिबिरात असलेल्या लोकांच्या कथा आणि त्यांचा संघर्ष लोकांसमोर आणण्याचे काम या माध्यमातून करण्यात आलं. त्याच्या या कामाची दखल संयुक्त राष्ट्रांनी घेतली. 


सन 2021 साली त्याने SheLeads Kakuma हा कार्यक्रम सुरू केला. त्या माध्यमातून त्याने महिला आणि मुलींसाठी काम सुरू केलं. न्हियाल डेंग हा सध्या हुरॉन युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये डिजिटल कम्यमुनिकेशनचे शिक्षण घेतोय. 


युनेस्को आणि लंडनमधील वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाला होता. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले होते. आता त्याच धर्तीवर ग्लोबल स्टुडंट अवॉर्ड सुरू करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी राजस्थानच्या रविंद्र बिष्णोई याला नामांकन मिळालं होतं. 


 




ही बातमी वाचा: