Snow Storm in America: जगातील शक्तीशाली देश अमेरिका (America) सध्या हिमवादळानं (Bomb Cyclone) हतबल झालाय. अमेरिकेतल्या कोट्यवधी नागरिकांचं जगणं बर्फवृष्टीनं मुश्किल केलंय. घराबाहेर पडता येत नाही, वीज नाही, आरोग्य सुविधा नाहीत आणि तापमान शून्य अशांच्याही खाली गेल्यानं अख्खी अमेरिका गारठून गेली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार 14 लाखांपेक्षा अधिक घरातील वीज गायब झाली आहे. तर तापमान -45 अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे
तुफान बर्फवृष्टीनं सध्या अमेरिका गोठून गेली आहे. अमेरिकतल्या बर्फवृष्टीची दृष्यं थरकाप उडवणारी आहेत. काही ठिकाणी तर तापमान विक्रमी उणे 45 अशांच्याही खाली गेले आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधली अनेक शहरं बर्फानं झाकून गेली आहेत. बर्फाच्या वादळानं लोकांना हाऊस अरेस्ट केलंय. घरांच्या भिंतींवर चार फुटांपर्यंत बर्फ साचला आहे. लोकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवणं मुश्किल बनलं आहे. इतकंच काय तर महाकाय समुद्रही बर्फाने गोठून गेला आहे.
बर्फाच्या वादळानं अमेरिका पुरती हादरली आहे. जवळपास 14 लाख लोकांच्या घरातली बत्ती गुल झाली आहे. अमेरिकतल्या विविध व्यवसायांना या हिमवादळानं ब्रेक लावला आहे. सध्या अमेरिकेतल्या 13 राज्यांत ब्लॅकआऊटचा धोका आहे. ब्लॅकआऊट झाला तर जवळपास साडे तेरा कोटी लोकांना त्रास सहन करावा लागेल आहे. अमेरिकेत बर्फाच्या वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
अमेरिकेत 'या' ठिकाणी हिमवादळाचा कहर?
- मिनीपोलिस
- डेलावेयर
- इलिनोइस
- इंडियाना
- केंटकी
- मैरीलैंड
- मिशिगन
- न्यू जर्सी
- उत्तर कैरोलिना
- ओहायो
- पेनसिल्विनीया
- टेनेसी
- वर्जिनिया
- वेस्ट वर्जिनिया
- वॉशिंगटन डीसी
अमेरिकेच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार जवळपास 20 कोटी जनतेला याचा फटका बसू शकतो. या हिमवादळानं ख्रिसमसच्या आनंदावर पाणी फेरलंय. आत्तापर्यंत जवळपास 7 हजार 700 विमान उड्डाणं रद्द झाली आहेत. हजारो लोक सध्या एअरपोर्टवर अडकून आहेत अमेरिकेच्या इतिहासातलं हे सर्वात भयंकर हिमवादळ मानलं जातंय. आत्तापर्यंत 48 जणांचा बळी घेणाऱ्या या वादळासमोर सुपरपॉवर अमेरिका हतबल झालेली दिसत आहे.