जगभरात वाढत चाललेल्या कोरोना व्हायरसमुळे प्रत्येकजण धास्तावला आहे. प्रत्येक देश या संकटावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. अनेक देशांमध्ये कोरोनामुळं लॉकडाऊन केला आहे. भारतात देखील 3 मेपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. भारतात 21 मेपर्यंत कोरोनाचा प्रभाव कमी होईल. 29 मे पर्यंत जगातील 97 टक्के भागातून कोरोनाचा प्रभाव कमी होईल, असा अंदाज सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी आणि डिझाईननं व्यक्त केला आहे.
21 मे पर्यंत भारतातला प्रभाव कमी होईल हे सांगण्यासाठी त्यांनी डेटा सायन्सचा आधार घेतला आहे. SUTD ने हे विश्लेषण संक्रमण पसरण्याच्या वेगाच्या आधारावर केलं आहे. ज्या देशात जास्त रुग्ण आहेत त्या सगळ्या देशांचा अभ्यास या विद्यापीठानं केला आहे. सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी आणि डिझाईननं स्पेन आणि इटलीबद्दल व्यक्त केलेले अंदाज खरे ठरत आहेत. त्यामुळे या अभ्यासाकडे लोक आशेनं पाहात आहेत.
भारतात कोरोनाबाधितांची संख्या 27 हजार 892 वर गेली आहे. तर आतापर्यंत 872 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. तर जगभरात मागील 24 तासात कोरोनाचे 73859 नवे रुग्ण सापडले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 2 लाख 6 हजार 969 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 29 लाख 94 हजार 352 वर पोहोचली आहे. जगभरात 8 लाख 78 हजार रुग्ण बरे झाले आहेत. मागील 24 तासात 73859 नवीन कोरोनाबाधित जगभरात सापडले आहेत. तर मागील 24 तासात जगात 3751 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. जगभरातील 210 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे.