मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2 लाख सहा हजारांच्या वर पोहोचली आहे. मागील 24 तासात कोरोनाचे 73859 नवे रुग्ण सापडले आहेत.  वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 2 लाख 6 हजार 969 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 29 लाख 94 हजार 352 वर पोहोचली आहे. जगभरात 8 लाख 78 हजार रुग्ण बरे झाले आहेत. मागील 24 तासात 73859 नवीन कोरोनाबाधित जगभरात सापडले आहेत. तर मागील 24 तासात जगात 3751 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.  जगभरातील 210 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे.


कोरोनाबाधित आणि मृत्यूचा आकडा होतोय कमी 

जगभरात मागील 24 तासात कोरोना संसर्ग आणि मृत्यूंच्या आकड्यांमध्ये घट झाल्याचे दिसून आलं आलं आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार काल 24 तासात 90,731 नवीन कोरोनाबाधित जगभरात सापडले होते. तर त्याआधी दिवसाला सरासरी एक लाख कोरोनाबाधित सापडत होते. तर कालच्या आकडेवारीनुसार त्याआधीच्या 24 तासात जगात 6,069 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला होता. तर मागील 24 तासात 73859 नवीन कोरोनाबाधित जगभरात सापडले आहेत. तर मागील 24 तासात मृत्यूचा आकडा देखील कमी झाला असून जगात 3751 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.

जगातील अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन हे पाच देश असे आहेत जिथं कोरोनामुळे 20 हजाराहून अधिक बळी गेले आहेत. एकट्या अमेरिकेत कोरोनाचे 50 हजारांहून अधिक बळी गेले आहेत.

जगात कोणत्या देशात किती बाधित

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 987160 कोरोनाचा संसर्ग झालाय.  तर 55413  लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोविड-19मुळं 23910 लोकांचा मृत्यू झालाय. 226629 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 26,644 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 197,675  इतका आहे.