Death Sentence : अंमली पदार्थांची तस्करी (Drugs Smuggling) रोखण्यासाठी जगभरातील विविध देशांमध्ये अतिशय कठोर कायदे करण्यात आले आहेत. त्यातच आज (26 एप्रिल) अंमली पदार्थांच्या तस्करीच्या गुन्ह्यात सिंगापूरमध्ये (Singapore) भारतीय वंशाच्या नागरिकाला फाशीची शिक्षा (Death Sentence) देण्यात आली. तंगाराजू सुपय्या (वय 46 वर्षे) असं या वक्तीचं नाव आहे. त्याला फाशी होऊ नये यासाठी त्याच्या कुटुंबाने कोर्टात याचिका दाखल केली होती. परंतु त्यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली. शिवाय राष्ट्रपतींकडेही दया याचिका केली होती, परंतु राष्ट्रपतीकडून त्यावर कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. अखेर आज त्याला फासावर लटकवण्यात आलं.


सिंगापूरमध्ये अंमली पदार्थांसंबंधीचे कायदे अतिशय कठोर आहेत. अंमली पदार्थांचं सेवन करणं आणि ड्रग्जची तस्करी करण्याच्या आरोपाखाली तंगराजू सुपय्या याला 2014 मध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर त्याला सिंगापूरहून एक किलो गांजाची तस्करी करण्याच्या आरोपात 9 ऑक्टोबर 2018 रोजी त्याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. आज 26 एप्रिल 2023 रोजी या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली.


चांगी तुरुंगात फाशी


अलजजीरा या वृत्तवाहिनीने आपल्या बातमीत सांगितलं होतं की, तंगाराजूने आपल्या बहिणीसोबतच्या बातचीतदरम्यान सांगितलं की, वजन केल्यानंतर अधिकारी त्याला फाशी देण्याच्या ठिकाणी घेऊन गेले. तंगाराजू सुपय्याला सिंगापूरच्या चांगी तुरुंग परिसरात फाशी देण्यात आली, असे सिंगापूर जेल प्रशासनाच्या प्रवक्त्याने एएफपीला सांगितलं.


तंगाराजूकडून कोर्टात बचाव 


तंगाराजू सुपय्या याच्या अटकेनंतर त्याची वैद्यकीय तपासणी झाली. त्याने अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं की नाही याची तपासणी करण्यात आली. परंतु या चाचणीत ते फेल झाला. मात्र आपण ड्रग्जच्या तस्करीत सहभागी नव्हतो, असा बचाव तंगाराजूने कोर्टात केला होता. शिवाय आपण कधीही अंमली पदार्थांची तस्करी केली नाही, असा दावाही त्याने केला होता. परंतु ही बाब तो कोर्टात सिद्ध करु शकला नाही. यांतर कोर्टाने आपल्या निकालात म्हटलं की, तंगाराजूच्या फोनवरुन सिद्ध झालं आहे की, तो ड्रग्जच्या तस्करीत सहभागी होता.


फाशीला कुटुंबियांचा विरोध


तंगाराजूच्या फाशीला त्याच्या कुटुंबियांनी आणि मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधात काम करणाऱ्या संस्थांनी विरोध केला होता. तंगाराजूला योग्य कायदेशीर मदत दिली नव्हती. त्याला इंग्लिश व्यवस्थित बोलता येत नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याचं म्हणणं योग्य पद्धतीने ऐकलं नाही. पोलिसांनी चौकशीदरम्यान त्याला तामीळ ट्रान्सलेटरची सोय देखील केली नाही, असा दावा संस्थेने केला. 


कोर्टाच्या निकालावर प्रश्न उपस्थित


दरम्यान तंगराजू सुपय्या याला फाशी देण्याच्या आधी कोर्टाच्या निकालावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणात ब्रिटीश अब्जाधीश रिचर्ज ब्रॅन्सन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये प्रश्न विचारला आहे की, त्याला फाशी द्यायला हवी का? सिंगापूर उद्या एका निर्दोष व्यक्तीला फाशी देणार आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.


रिचर्ड ब्रॅन्सन यांचं हे वक्तव्य सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने गांभीर्याने घेतलं आहे. त्यांच्या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. ब्रॅन्सन यांच्या विचारांमुळे देशातील न्यायाधीश आणि न्याय व्यवस्थेचा अनादर होत आहे. सोबतच मंत्रालयाने स्पष्ट केलं की, अंमली पदार्थ आणि त्यांची तस्करी अजिबातच खपवून घेतली जाणार नाही. याचा सामना करण्यासाठी आम्ही झिरो टॉलरन्सचा दृष्टिकोन स्वीकारला आहे.