Shooting in Newport News Virginia: अमेरिकेतील (America) घातक बंदूक संस्कृतीला (Shooting in America) आणखी एक निष्पाप जीव बळी पडला आहे. यावेळी मात्र बंदूक चालवणारे हात प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांचे होते. अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनं पुन्हा एकदा जगातील महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका पुन्हा एकदा हादरली आहे. 


शुक्रवारी अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये (Virginia) एका प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यानं केलेल्या गोळीबारात एक शिक्षिका गंभीर जखमी झाली. तात्काळ शिक्षिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. शिक्षिकेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिक्षिकेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी अद्याप या प्रकरणी सविस्तर माहिती दिली नसली, तरी व्हर्जिनियातील न्यूपोर्ट न्यूज शहरातील प्राथमिक शाळेत ही घटना घडल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, या गोळीबारात एकही विद्यार्थी जखमी झालेला नाही.


व्हर्जिनियाचे महापौर फिलिप जोन्स यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, पोलिसांनी या प्रकरणी एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. या विद्यार्थ्याचं वय किती आहे हे अधिकाऱ्यांनी सांगितलं नसलं तरी मीडिया रिपोर्ट्समध्ये, गोळीबार करणारा विद्यार्थी केवळ 6 वर्षांचा असल्याचं सांगण्यात आलं आहे. न्यूपोर्टचे पोलीस प्रमुख स्टीव्ह ड्रू यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी दोनच्या सुमारास आम्हाला गोळीबाराच्या संदर्भात कॉलवर माहिती मिळाली. माहिती मिळताच आमचं पथक घटनास्थळी पोहोचलं.


पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती नाही 


शाळा प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी जखमी शिक्षिकेला तात्काळ रूग्णालयात दाखल केलं आहे. तर शाळेतील विद्यार्थ्यांना आपापल्या पालकांसोबत घरी सोडलं जात आहे. पुढील तपासानंतर याप्रकरणासंदर्भात अधिक माहिती दिली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. सध्या पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. ही गोळीबाराची घटना घडलेल्या न्यूपोर्ट न्यूज शहराची लोकसंख्या 1 लाख 85 हजारांपेक्षा जास्त आहे. हे शहर चेसापीक आणि व्हर्जिनिया बीचपासून 40 मैलांवर आहे. हे शहर यूएस नेव्हीसाठी जहाजबांधणीमुळेही ओळखलं जातं.


गोळीबाराच्या घटना वाढत्या... 


गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि गोळीबार हे समीकरण झालं आहे. गेल्या वर्षी म्हणजेच, 2022 मध्ये अमेरिकत गोळीबारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या या घटना हॉस्पिटल, पब, मेट्रो स्टेशन आणि इतर सार्वजनिक ठिकाणी घडल्या आहेत. अमेरिकेसाठी तेथील बंदूक संस्कृती ही दिवसागणिक मोठी समस्या होत चालली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. देशात शस्त्रास्त्रांबाबत कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचं मत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वत: व्यक्त केलं आहे.