शिवजयंती कार्यक्रमाला न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कनेक्टिकट, पेनसिल्व्हेनिया आणि मॅसॅच्युसेट्स या सभोवतालच्या राज्यातूनही शिवभक्त उपस्थित होते. यावेळी अल्बानी ढोल-ताशा समूहाच्या कलाकारांनी शिवजन्म, शिवराज्यभिषेकाचे प्रयोग सादर केले आहेत. यासोबतच तबला, विणा वादनासह संगिताचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलतांना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत आदरांजली वाहिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'छत्तीसगड आणि विदर्भ हे एकाच बेरार प्रांताचे भाग होते आणि आजही मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक छत्तीसगडमध्ये राहत असल्याचं सांगतांनाच छत्तीसगडची महाराष्ट्रासोबत सामाजिक नाळ असल्याचं म्हटलंय. साता समुद्रापार शिवविचार पेरणाऱ्या छत्रपती फाउंडेशनच्या कार्याचाही त्यांनी यावेळी गौरव केला. सोबतच आयोजनासाठी भारतीयांना प्रोत्साहीत करणाऱ्या भारतीय वाणिज्य दूतावासाचंही त्यांनी कौतुक केलं.
यावेळी बोलताना उद्योगपती आणि 'कॉग्निजंट सॉफ्टवेअर' समूहाचे सीईओ मनोज शिंदे यांनी अमेरीकन कॉर्पोरेट जगतातील भारतीयांच्या योगदानाचा गौरव केला. यासोबतच त्यांनी मराठी तरूणाईला व्यवसायात उतरण्याचं आवाहन केलं. भारतीय वाणिज्य दुतावासातील अधिकारी ए. के. विजयकृष्णन यांनी शिवजयंती साजरी करणारं आपलं दुतावास अमेरिकेतील प्रथम वाणिज्य दूतावास असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला.
याच कार्यक्रमानंतर घेण्यात आलेल्या मार्गदर्शन सत्रात आय.आय. सॉफ्टवेअरचे सीईओ श्याम कुमार, फ्लोरिडाच्या एन.वाय. कॉलेजचे अध्यक्ष अमित शोरेवाला, ग्लोबल इन्फोटेक सोल्यूशन्सचे उपाध्यक्ष किशोर गोरे आणि सत्राचे समन्वयक गौरव दळवी यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी छत्रपती फाऊंडेशनचे अनेक वर्षांपासून सदस्य असलेले आणि विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये महेंद्र सिनारे, रोहन डाबरे, मिस भारत न्यूयॉर्क अलिशा मर्चंट यांचा समावेश आहे.
आज छत्रपती फाऊंडेशनच्या वतीनं कोलोरॅडो प्रांतातील डेन्व्हर आणि टेक्सास राज्यातील डलास येथेसुद्धा आज शिवजयंती साजरी करण्यात आलीय. आजच्या कार्यक्रमासाठी क्रिकेटस्टार अजिंक्य रहाणे, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार विनायक मेटे यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्यात.
न्यूयॉर्कमधील या शिवजयंती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष विनोद झेंडे, सचिव गौरव दळवी, कल्याण घुले (अल्बनी), अभिनव देशमुख (जॉर्जिया ), ऋषिकेश माने (पेनसिल्व्हेनिया), साकेत धामणे (न्यूयॉर्क), प्रशांत भुसारी (टेनेसी), प्रियंका कुरकुरे (न्यू जर्सी), श्रद्धा सहाणे (न्यू जर्सी), सुरेश गायकवाड (कनेक्टिकट) या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.