Shivaji Jayanti 2023: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. महाराजांची जयंती फक्त देशातच नाही तर परदेशातही मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यातच लंडन (London) येथे शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी लंडन येथिल संसद चौकात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी विद्यार्थांनी जय शिवराय अशा घोषणांनी संसदभवन परिसर दणाणून सोडले.      

  


छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य संपूर्ण जगात परिचित आहे. आपल्या युद्ध कला आणि सर्वसमावेशक प्रशासकीय नैपुण्य यांमुळे शिवाजी महाराज हे आदर्श राजे ठरले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे दाखले देणारे अनेक युद्ध साहित्य लंडन येथिल म्यूजियमला आहे. शिवाजी महाराजांचे एक अस्सल पेंटिंग देखील ब्रिटिश लायब्ररीला आहे. जगासमोर एक नवा आदर्श निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लंडनच्या संसद चौकात साजरी करताना उपस्थित युवकांत नवचैतन्य निर्माण झाले होते.


Shivaji Jayanti 2023: मुंबई विमानतळावर मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला केलं अभिवादन


संपूर्ण महाराष्ट्रात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येत आहे. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण केला. एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांकडून राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः भाजपबद्दल बोलायचे झाले, तर मुंबईतील बीएमसीच्या एकूण 227 वॉर्डांमध्ये 300 हून अधिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे. 


राज्यभरात शिवजयंती जल्लोषात साजरी 


राज्यभरात शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली आहे. यातच परभणीत सुदर्शना कच्छवे आणि तिच्या सहकारी कलाकारांनी 5 दिवस सतत काम करून अनोख्या पद्धतीने शिवरायांना वंदन केले आहे. तब्बल 3100 चौरस फुटांत राजमुद्रेत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याभोवती अष्टप्रधान मंडळ असलेली रांगोळीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. शहरातील गांधी पार्कमध्ये ही अतिशय देखणी प्रतिकृती या कलाकारांनी साकारली असून यासाठी 500 पोते रांगोळी या कलाकारांना लागली आहे. शिवरायांसह त्यांचे अष्टप्रधान मंडळ असलेली ही प्रतिकृती पाहण्यासाठी परभणीकरांनी मोठी गर्दी केली आहे.