यूएई: मराठी माणूस देशात असुदे की परदेशात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना विसरुच शकत नाही. स्वराज्य स्थापन करून जनतेची सेवा करणारा जगप्रसिद्ध राजा अशी ख्याती असणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आखातामधील यूएईमध्ये साजरी करण्यात आली. सलग तिसऱ्या वर्षी साजरा झाला भव्य शिवजयंती उत्सव सोहळ्यामध्ये जवळपास दोन हजाराहून जास्त शिवभक्तांनी हजेरी लावली.

आखातात स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला आपल्या महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाची ओळख करून देण्यासाठी आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम पार पाडणाऱ्या ईन्स्पायर इव्हेंट्स युएई तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अंतर्गत महाराष्ट्राची लोककला शिवकल्याण राजा - संगीत संध्या, पोवाडा, भारुड, एकांकिका, गवळण, लेझिम, त्रिविक्रम ढोल पथक, बाल्या नृत्य, कोळीगीत अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच वाचन आणि खाद्य संस्कृती यांसारखे कार्यक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करण्यात आले.



या उत्सवात आखाती देशातले पहिले आणि एकमेव अशा त्रिविक्रम ढोल ताशा पथकाने जवळपास 30 कलाकार घेऊन ढोल ताशा, ध्वज, लेझीम, लाठी-काठी याचे सादरीकरण केले. या पथकाचा हा 56 वा कार्यक्रम असल्याचे पथकाचे संस्थापक सागर पाटील यांनी सांगितले. युएई मधील तमाम शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहात शिवजयंती साजरी केली. यावेळी परिसर छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषांनी निनादून गेला होता.