नाशिक : नाशिकमधल्या ओझर विमानतळावरुन आता थेट दुबई सह आखाती देशात शेळ्या मेंढ्यांची निर्यात सुरु झाली आहे.  जिवंत प्राण्यांची विमानांमधून निर्यात होण्याचा देशातला हा पहिलाच व्यापारी प्रयोग ठरला आहे. या कार्गो सेवेमुळे नाशिकच्या हवाई व्यापार सेवा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.

 

नाशिकमधील पशुपालन करणाऱ्या शेतकरी आणि व्यावसायिकांना यामुळे परदेशी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. अमिगो लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि सानप अॅग्रो अॅनिमल्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी संयुक्तरित्या सुरू केलेल्या ओझर ते दुबई कार्गो सेवेमुळे नाशिक परिसरातील पशुपालन व्यवसायाला चालना मिळणार आहे.



 

दुबईसोबतच अबुधाबी, अजमाल, शारजा, फुजेरामधील व्यापाऱ्यांनी गेल्या 3 आठवड्यांत सानप अॅग्रोच्या माध्यमातून 10 हजारापेक्षा अधिक शेळ्या-मेंढ्यांची खरेदी केली आहे. नाशिक परिसरासह ओझर, पिंपळगाव, मालेगाव, सायखेडा बाजारातून या शेळ्या-मेंढ्या खरेदी केल्या जातात. त्यांची प्रतवारी, दर्जा, आरोग्यतपासणी आणि कस्टमच्या प्रक्रिया ओझर विमानतळावर पार पाडल्या जातात.

 

कार्गो सेवेसाठी ओझर विमानतळावर अत्याधुनिक दर्जाचं कार्गो संकुल, गोदाम, कोल्ड स्टोअरेज, स्क्रिनिंग, बारकोडिंग, ईडीआय लिंकेज असलेले कस्टम्स, सिंगल विंडो क्लिअरन्स या सुविधा उभारण्यात आल्या आहेत.