न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्कमधल्या मॅनहॅटनमध्ये प्रसिद्ध 'टाइम स्क्वेअर'जवळ स्फोट झाला आहे. स्थानिक वेळेनुसार सोमवारी सकाळी साडेसात वाजता हा स्फोट झाला. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.


हा आत्मघातकी स्फोट असल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोट घडवणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तो जखमी आहे.



पोर्ट ऑथरिटी बस टर्मिनलजवळ हा स्फोट झाला. खबरदारी म्हणून 40th स्ट्रीट आणि 8th अॅव्हेन्यूजवळच्या सबवे लाईनवरील सर्व प्रवाशांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं. बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालं असून परिसर रिकामा करण्यात आला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच जेरुसलेमला इस्रायलची राजधानी जाहीर केल्यामुळे कट्टरवाद्यांनी हा हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाताळचा सण अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे भीतीचं सावट पसरलं आहे. मात्र अद्याप या स्फोटाला दहशतवादी हल्ला संबोधता येणार नसल्याचं म्हटलं जात आहे.