Saudi Arbia: जगभरात सध्या प्रत्येक क्षेत्रात महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. प्रत्येक क्षेत्रातील त्यांच्या सहभागी वाढत चालला आहे. अशातच जगभरातील असे काही देश जे महिलांवर अनेक निर्बंध लादायचे, तेदेखील आपली मानसिकता बदलताना दिसत आहेत. सौदी अरेबियानं (Saudi Arabia) याचबाबत एक पाऊल पुढे टाकलं आहे. सौदी अरेबियातील पहिली महिला अंतराळात झेप घेण्यासाठी तयार आहे. मे महिन्यात रेयाना बरनावी (Rayyanah Barnawi) अंतराळात जाणार आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, 9 मे रोजी रेयाना बरनावी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसाठी रवाना होईल. रेयानासोबत अल-कर्नीही आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात जाणार आहे. नासानं याला दुजोरा दिला आहे. रेयाना पेशानं ब्रेस्ट कॅन्सर संशोधक आहे. रेयाना इतिहास रचणार असून सौदी अरेबियातून अंतराळात जाणारी पहिली महिला ठरणार आहे. 


रेयाना बरनावीसोबत आणखी दोन लोक अंतराळात जाणार आहेत, ज्यात नासाचे माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन आणि बिजनेसमन जॉन शॉफनर यांचा समावेश आहे. याआधी एक अंतराळवीर सुल्तान अल नेयादी याला अंतराळात पाठवण्यात आलं आहे. आता 9 मे रोजी निघालेले अंतराळवीर तिथे पोहोचतील आणि अल नेयादी यांना भेटतील. या ऑपरेशनची जबाबदारी स्पेस-एक्स कॅप्सूलवर असेल. 


पेशानं एक ब्रेस्ट कॅन्सर रिसर्चर रेयाना बरनावीनं स्पेस अँड टेक्नॉलॉजी फिल्डचं शिक्षण घेतलं आहे. रेयाना पहिली महिला आहे, जिनं हे खास शिक्षण घेतलं आहे. याव्यतिरिक्त तिनं न्यूझीलंडच्या ओटॅगो युनिवर्सिटीतून जेनेटिक इंजिनिअरिंग आणि टिश्यू डेव्हलपमेंटमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. 




सलमाननं आधीच पुढाकार घेतलाय 


सौदीचे क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांनी देशाची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी 2017 मध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांनी सौदीतील महिलांना पुरुष गार्जियनशिवाय गाडी चालवण्याची परवानगी दिली होती. त्याचबरोबर महिलांना पुरुष पालकांशिवाय एकट्यानं विमान प्रवास करण्याचा अधिकारही देण्यात आला.


यापूर्वीही सौदीनं रचलाय विक्रम 


याआधीही सौदीनं आपल्या नावावर एक विक्रम प्रस्थापित केला आहे. दरम्यान, अंतराळ मोहिमेवर जाणारा पहिला मुस्लिम अंतराळवीर फक्त सौदीचा आहे. सौदीचे युवराज सुल्तान बिन सलमान बिन अब्दुल अजीज यांनी 1985 मध्ये हा विक्रम आपल्या नावावर केला होता. त्यांच्यानंतर, यूएईचा हज्जा अल मन्सूरी 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेला होता.