Saudi Arabia Citizenship Rules Change: सौदी अरेबिया (Saudi Arabia) सरकारनं देशातील नागरिकत्वाबाबत (Citizenship Rules) मोठा बदल केला आहे. मात्र, हा बदल कोणाचं नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही तर नागरिकत्व बहाल करण्यासंदर्भातील आहे. नव्या नियमांनुसार, आता सौदी वंशाच्या सर्व महिलांची मुलं ज्यांनी परदेशी लोकांशी विवाह केला आहे, ते सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia News) नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात. 


मात्र, नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्या मुलांचं वय किमान 18 वर्षे असावं आणि त्यांनी नागरिकत्व मिळविण्यासाठी सर्व निकष पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. भारतातील प्रवाशांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण सौदी अरेबियात अनेक भारतीय राहतात, ज्यांनी सौदी वंशाच्या महिलांशी विवाह केला आहे. 


सौदी गॅझेट वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांनी सौदी अरेबियाच्या राष्ट्रीयत्व प्रणालीच्या कलम 8 मध्ये बदल करण्यास मान्यता दिली आहे. या सौदीच्या लेखातील बदलानंतर "ज्या व्यक्तीचा जन्म सौदी अरेबियात झाला आहे आणि त्याचे वडील परदेशी नागरिक आहेत. परंतु, आई सौदी वंशाची आहे, तर त्या व्यक्तीला सौदी अरेबियाचं नागरिकत्व मिळू शकतं."


मात्र, नागरिकत्व मिळण्यापूर्वी अनेक अटींची पूर्तता करणं आवश्यक असणार आहे. सौदी अरेबियाच्या नागरिकत्वासाठी अर्ज करणारी व्यक्ती अरबी भाषेत पारंगत असावी. ती सुस्वभावी असावी. त्या व्यक्तीवर कोणतीही कायदेशीर कारवाई सुरू नाही ना किंवा त्यानं 6 महिन्यांहून अधिक काळ तुरुंगवास भोगलेला नसावा. 


सध्या सौदी अरेबियात लाखो भारतीय राहतात


सौदी अरेबियामध्ये सुमारे 25 लाख भारतीय प्रवासी राहतात. यापैकी बहुतेक लोक अशा लोकांपैकी आहेत, जे तिथे मजुरीवर किंवा छोट्या कंपन्यांमध्ये काम करतात. सौदी अरेबियामध्ये व्यवसाय प्रस्थापित करणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे. तसेच, अनेक भारतीय प्रवाशांनाही सौदी वंशाच्या महिलांशी विवाह केला आहे. 


नागरिकत्वाच्या नियमांमध्ये बदल होण्यापूर्वी सौदी वंशाच्या महिलेचं लग्न होत असे, परंतु तिच्या मुलांना नागरिकत्व मिळणं कठीण होतं. आता सरकारच्या या निर्णयानंतर ज्यांचे वडील भारतीय वंशाचे आहेत, परंतु त्यांची आई सौदी वंशाची आहे, असे अनेक लोक नागरिकत्त्वासाठी अर्ज करु शकतात.  


सौदी अरेबियाने हजबाबत घेतलेल्या निर्णयाचा फायदा भारतीयांनाही होणार 


अलिकडेच सौदी अरेबियाच्या सरकारनं हज यात्रेबाबतही निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा लाखो भारतीय मुस्लिमांना झाला आहे. खरंतर, 2023 सालासाठी सौदी अरेबियानं भारतातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंच्या संख्येत मोठी वाढ केली आहे.


सौदी अरेबियाच्या या निर्णयानंतर यंदा एक लाख 75 हजार 25 लोक हजला जाऊ शकतात. विशेष म्हणजे, आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं लोक हज यात्रेसाठी आले होते. भारतीयांसाठी एवढा मोठा हज कोटा यापूर्वी कधीच राखून ठेवण्यात आलेला नव्हता.