सलमान खान सर्वात वजनदार महिला इमानची भेट घेणार
एबीपी माझा वेब टीम | 15 Feb 2017 03:31 PM (IST)
मुंबई : वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी जगातील सर्वात वजनदार महिला भारतात आली आहे. बारीक होण्यापलिकडे 36 वर्षीय इमानची एक सुप्त इच्छा आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची भेट घेण्याची इमानची इच्छा लवकरच पूर्ण होण्याची चिन्हं आहेत. सर्जरी होण्यापूर्वी इमान सलमानच्या किक, दबंग, सुलतान यासारख्या चित्रपटातली गाणी टीव्हीवर बघत आहे. चाहत्यांच्या भेटीगाठीच्या इच्छा सलमान सहसा टाळत नाही. कुठलीही अधिकृत विचारणा झाली, तर आम्ही त्याबाबत विचार करु, असं सलमानचे पिता सलीम खान यांनी सांगितलं आहे. सलमान अशाप्रकारे अनेक रुग्णांची भेट घेतो, त्यामुळे विनंती नाकारण्याचा प्रश्नच नसल्याचंही सलीम खान म्हणाले. 500 किलो वजनाची इमान अहमद वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी इजिप्तहून खास मुंबईत दाखल झाली आहे. इमान अहमद अब्दुलातीला विमानतळावरुन हलवण्यासाठी खास क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती.