नवी दिल्ली: पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आयोजित सार्क संमेलानात सहभागी झालेल्या केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना आपला दौरा अर्ध्यावरच सोडून परतावे लागले. राजनाथ सिंह यांनी दहशतवादवरून खडे बोल सुनावत पाकिस्तानला चांगलेच धारेवर धरले. पण पाकिस्तानने आपल्या नापाकी कारवायांचे दर्शन घडवल्याने राजनाथ सिंहांनी परिषदेतून काढता पाय घेतला.


 

राजनाथ सिंह आता संसदेमध्ये पाकिस्तानातील आपल्या सार्क दौऱ्यावेळीच्या नापाकी कारवाईची माहिती देणार आहेत. राजनाथ सिंहांनी केवळ २० तासच पाकिस्तानामध्ये घालवले.

 

राजनाथ सिंहांच्या भाषणातील ब्लॅक आऊटच्या वृत्ताचे परराष्ट्र खात्याने त्यांचे सार्क संमेलनातील भाषण थांबवले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्क संमेलनात यजमान देशालाच संपूर्ण कव्हरेज दिले जाते, तर इतर देशांच्या भाषणाचा सुरुवातीचा काहीच भाग प्रदर्शित केला जातो.

 

राजनाथांचे पाकिस्तानला सुनावले खडे बोल

 

राजनाथ सिंहांनी सार्क संमेलनावेळी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले की, ''चांगला दहशतवाद आणि वाईट दहशतवाद असा कोणताही प्रकार नसतो. आणि दहशतवाद्यांमध्येही चांगाले वाईट असा फरक करता येतो. दहशतवाद्यांना शहिदाची उपमा देणे बंद झाले पाहिजे.''

 

राजनाथ पुढे म्हणाले की, ''दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या आणि त्यांना आश्रय देणाऱ्या देशांवर कडक कारवाई झाली पाहिजे. केवळ दहशतवादी कारवायांवर निषेध व्यक्त करणे योग्य नाही. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे.''

 

पाकच्या नापाकी कारवाया

पाकिस्तानने आज भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे भाषण प्रसारित न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडियाला त्यांच्या भाषणाच्या कव्हरेजवरून रोखण्यास भाग पाडले.

 

राजनाथ सिंहांची नाराजी व्यक्त

याची माहिती मिळताच गृहमंत्री राजनाथ सिंहांनी पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्र्यांनी आयोजित केलेल्या जेवणावर बहिष्कार टाकला. यानंतर या जेवणाचे आयोजक चौधरी निसार हे त्या ठिकाणावरून निघून गेले. पाकिस्तानने पंतप्रधान नवाज शरिफ यांच्या भाषणाचे प्रसारण केले, पण भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंहांच्या भाषणाच्या प्रसारणाला हरकत घेतली.

 

दोन्ही देशाच्या गृहमंत्र्यांच्या हस्तांदोलनात प्रतिबिंब

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाचे वातावरण सार्क देशांच्या परिषदेवेळी पाहायला मिळाले. राजनाथ सिंह आणि पाकिस्तानचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हास्तांदोलनामध्येही वादाचे प्रतिबिंब दिसले.

 

पंतप्रधान शरीफांच्या बुरहान वानीच्या कौतुकाने तणाव

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काश्मीरमध्ये मारला गेलेल्या दहशतवादी बुरहान वानीचे कौतुक केले. विशेष म्हणजे, शरीफांनी काश्मीर हा एक दिवस पाकिस्तानचा भाग असेल अशी टिप्पणी केल्याने वातावरणातील तणाव अधिकच वाढला. यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अक्षेप घेऊन पाकिस्तानचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही असे स्पष्ट केले.

 

या परिषदेला उपस्थित राहण्यापूर्वी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवाद आणि संघटीत गुन्ह्याविरोधात अर्थपूर्ण सहकार्याला अधोरेखित केले होते.