S. Jaishankar Reaction On Bilawal Bhutto : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) यांनी आक्षेपार्ह वक्टव्य केलं. यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी पाकिस्तानला (Pakistan) सुनावलं आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी यावेळी म्हटलं की, भारताला पाकिस्तानकडून जास्त अपेक्षा नाहीत. पाकिस्तानकडून वारंवार दहशतवादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरु असून भारताला लक्ष केलं जात आहे.


पंतप्रधान मोदी यांच्यावरील पाकच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया देत, पाकिस्तानचं वर्तन असभ्य असल्याचं म्हटलं. पाकिस्तानच्या या वक्तव्यामुळे त्यांची पातळी घसरली आहे. भारत-जपान कॉन्क्लेव्ह दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, 'भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानबद्दलचे विचार सांगितले आहेत. भारताला पाकिस्तानबद्दल काय वाटते हे मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल भुट्टोंच्या आक्षोपार्ह वक्तव्याबद्दल विचारले असता जयशंकर यांनी सांगितलं की, 'पाकिस्तानकडून आम्हांला आधीपासूनच जास्त अपेक्षा राहिलेल्या नाहीत.'


पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो


बिलावल यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत परराष्ट्र मंत्रालयाचे अध्यक्ष अरिंदम बागची यांनी शुक्रवारी सांगितले की, 'पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दहशतवादाला देशाच्या धोरणाचा भाग बनवणाऱ्या देशातील दहशतवादी संघटनांच्या मुख्य सूत्रधारांवर आपली प्रतिक्रिया दिली असती तर बरे झाले असते. पाकिस्तान असा देश आहे, जो ओसामा बिन लादेनचा शहीद म्हणून गौरव करतो. पाकिस्तान झाकीउर रहमान, हाफिज सईद, मसूद अझहर, साजिद मीर, दाऊद इब्राहिम यांसारख्या दहशतवाद्यांना आश्रय देतो.'


बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 'ही' टीका केली


पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना म्हटले की, 'ओसामा बिन लादेन मारला गेला पण 'गुजरातचा कसाई' जिवंत आहे आणि तो भारताचा पंतप्रधान आहे. ते पंतप्रधान होईपर्यंत त्यांना अमेरिकेत येण्यास बंदी होती.' भुट्टो यांनी पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. 


'लादेनचा पाहुणचार करणाऱ्यांना उपदेश देण्याचा अधिकार नाही'


भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रांमध्ये भरबैठकीतही पाकिस्तानला सुनावलं होतं. दहशतवादी ओसामा बिन लादेनचा पाहुणचार करणाऱ्या देशाला उपदेश करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jayshankar) यांनी पाकिस्तानला भर बैठकीत झापलं होतं. 


'पाकिस्तान दहशतवादाचं केंद्र'


भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर न्यूयॉर्कमध्ये म्हणाले होते की, 'जग पाकिस्तानकडे दहशतवादाचे केंद्र म्हणून पाहते. त्यांनी अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्या 2011 मध्ये भारताच्या शेजारी देशाबाबत केलेल्या वक्तव्याची आठवण करुन दिली. हिलरी यांनी म्हटलं होतं की, तुम्ही साप पाळला तर तो फक्त शेजारीच नाही तर तुमच्या घरातील लोकांनाही चावेल.