Alibaba Jack Ma : नावात काय आहे, असं अनेकजण म्हणत असतात. मात्र, नावाचे महत्त्व आणि त्याची किंमत चीनमधील उद्योजक आणि अलीबाबा या ई-कॉर्मस कंपनीाचा मालक जॅक मा याला कळून चुकली आहे. नावाच्या साधर्म्यामुळे अलीबाबा कंपनीला काही मिनिटांत तब्बल 26 अब्ज डॉलरचा फटका बसला. सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
मागील काही महिन्यांपासून उद्योजक जॅक मा आणि चीन सरकारमध्ये चांगले संबंध नाहीत. आर्थिक धोरणांवर टीका करून जॅक मा याने चीन सरकारची नाराजी ओढावून घेतली आहे. अलीबाबा या ई-कॉमर्स कंपनीचा संस्थापक असलेल्या जॅक मा हा कधीकाळी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. मात्र, चीन सरकारची नाराजी ओढावून घेतल्यानंतर जॅक मा याचे दिवस फिरले आहेत.
कसा बसला 26 अब्ज डॉलरचा फटका
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमधील सरकारी वृत्तवाहिनीने मा नावाच्या एका व्यक्तीला 25 एप्रिल रोजी चीनच्या सुरक्षा यंत्रणांनी हेंग्झू शहरातून ताब्यात घेतले. या व्यक्तीविरोधात चीनविरोधी शक्तींशी हातमिळवणी करून सरकारविरोधात कट रचल्याचा आरोप आहे. ही बातमी समोर येताच, हाँगकाँगमधील गुंतवणूकदारांनी अलीबाबा कंपनीचे शेअर विकण्यास सुरुवात केली. शेअर विक्रीमुळे अलीबाबाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. काही क्षणातच कंपनीच्या बाजार भांडवलात 26 अब्ज डॉलरची घसरण झाली.
मा नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेल्या हेंग्झू शहरात अलीबाबा कंपनीचे कार्यालय आहे. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती ही अलीबाबा कंपनीची संस्थापक नसल्याचे 'ग्लोबल टाइम्स'च्या माजी संपादकाने स्पष्ट केले. मात्र, तोपर्यंत अलीबाबाच्या शेअरमध्ये 9.4 टक्क्यांची घसरण झाली होती. जॅक मा याला ताब्यात घेण्यात आले नसल्याचे समोर येताच अलीबाबाचा शेअर सावरू लागला होता.
शालेय शिक्षक ते उद्योजक असा प्रवास करणाऱ्या जॅक मा हे चीनमधील अनेकांसाठी प्रेरणास्थानी होते. मात्र, त्यांनी चीन सरकारच्या आर्थिक धोरणाबाबत टीका केल्यानंतर त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सरकारकडून विविध पातळींवर चौकशी सुरू करण्यात आली. चीन सरकारवर टीका केल्यानंतर जॅक मा हे काही महिने अज्ञातवासात होते. त्यावेळी अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.