Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज आठवा दिवस आहे. यामध्येच पाश्चात्य देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. पुतीन यांच्या विरोधात अमेरिका, युरोपात रोज निदर्शने सुरू आहेत. काही पोस्टर्समध्ये पुतीन यांना '21 व्या शतकातील हिटलर' असे म्हणण्यात आले आहे. आता फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील ग्रेविन संग्रहालयानेही पुतीन यांची तुलना हिटलरशी केली आहे. यासोबतच ग्रेविन संग्रहालयाने पुतिन यांचा मेणाचा पुतळा देखील हटवला आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे संग्रहालयाच्या संचालकाने एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले. ग्रेविन संग्रहालयाचे संचालक म्हणाले आहेत की,"आम्ही कधीच हिटलर सारख्या हुकुमशहांना स्थान दिलं नव्हतंं, पुतीन यांनाही प्रतिनिधीत्व देणार नाही"
पुतीन यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शाळकरी मुलांना अटक
पुतीन यांना आपल्या देशातच विरोधाचा सामना करावा लागत आहे. युद्धाला विरोध करणाऱ्या शाळकरी मुलांना रशियन पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. ओव्हीडी इन्फोच्या रिपोटनुसार, रशियाच्या 50 शहरांमध्ये युद्धविरोधी निदर्शनांच्या आरोपाखाली 7000 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे. मॉस्कोमधील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शाळकरी मुलांना पोलीस गाडीत घेऊन जात असल्याचे आणि पोलीस पोलीस ठाण्यात ठेवल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. युद्धाच्या विरोधात पोस्टर लावल्याने या मुलांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात अतिरेकी आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रशियामध्ये सरकार किंवा युद्धविरोधी निदर्शन केल्यास देशद्रोहाच्या कलमांखाली गुन्हा नोंदवण्याची तरतूद आहे.
दरम्यान, रशियाने युक्रेनच्या प्रमुख शहरांवर हल्ले तीव्र केले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की जास्तीत जास्त मदत मिळावी म्हणून आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीची मागणी केली. यासोबतच युक्रेन आणि रशिया यांच्यातील चर्चेची दुसरी फेरीही आज होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War: युक्रेननं भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवलं, रशियाचा आरोप; मदतीसाठी सरसावणार!
- Ukraine Russia War: युक्रेनची रशियन सैनिकांच्या मातांना साद, मुलांना कीव्हमधून घेऊन जाण्याची विनंती
- Russia-Ukraine War : रशिया युक्रेनशी चर्चेसाठी तयार, दोन्ही देशांमध्ये होणार दुसरी बैठक?