Russia Ukrain War : रशियासोबत दोन हात करण्यासाठी आम्हाला एकटं सोडण्यात आलं असल्याचे युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमीर झेलन्सकी  (Volodymyr Zelenskyy) यांनी म्हटले. झेलन्सकी यांनी देशाला संबोधित करणारा एक व्हिडिओ मेसेज प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओत रशियाच्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत माहिती दिली. 


युक्रेनला एकटं सोडलं


झेलन्सकी यांनी सांगितले की, रशियाने केलेल्या हल्ल्यात 137 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 316 जण जखमी आहेत. या युद्धात जगाकडूनही युक्रेनला मदत मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. रशियाच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी युक्रेनला एकट सोडण्यात आलं असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या बाजूने लढण्यासाठी कोण उभं आहे? मला एकही देश युक्रेनच्या बाजूने दिसत नाही. युक्रेनला नाटोचं सदस्यत्व देण्याची हमी कोण देण्यास तयार आहे? प्रत्येकजण घाबरत असल्याचे त्यांनी सांगितले. 


युक्रेनच्या नागरिकांना आवाहन 


राष्ट्रपती झेलन्सकी यांनी कीवमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. रशियन फौजांनी राजधानी कीवमध्ये प्रवेश केल्यास शहरातील नागरिकांनी सतर्क रहावे आणि संचारबंदीचे पालन कराव असे त्यांनी म्हटले. आपण देश सोडून जाणार नसून कुटुंबीयांसह युक्रेनमध्येच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


रशियानं युक्रेनमध्ये लष्कर घुसवल्यानंतर अमेरिका आणि अन्य नाटो (NATO) देश त्यांना मदत करतील, अशी शक्यता होती. मात्र सध्या तरी युक्रेनचा एकाकी लढा सुरू असल्याचं दिसत आहे. नाटो देशांनी अद्याप युक्रेनमध्ये सैन्य पाठवलं नाही, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनीही अद्याप युक्रेनमध्ये सैन्य तैनात करण्याबाबत नकार दिला आहे. परंतु, रशियाला जे मदत करतील त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही बायडन यांनी दिला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha