Russia Ukraine War : रशिया-युक्रेनमध्ये मागील पाच दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही बाजूकडील जीवितहानी झाली आहे. युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी रशिया आणि युक्रेनमध्ये बेलारूसमध्ये जवळपास पाच तास चर्चा झाली. मात्र, या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही. दोन्ही देशांनी चर्चा सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. तर, दुसरीकडे चर्चा संपल्यानंतर रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवरील हल्ले तीव्र केले.
रशिया-युक्रेन चर्चा सुरू राहणार
रशियन शिष्टमंडळाचे प्रमुख व्लादिमीर मेडिन्स्की म्हणाले की, "आम्ही बैठकीतील अजेंडाच्या प्रत्येक पैलूकडे लक्ष दिले आहे." काही मुद्यांवर दोघांनी परस्पर भूमिका दाखवली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही संवादाची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे मान्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.
बेलारूसमध्ये पुढील बैठक
रशिया आणि युक्रेनमध्ये झालेल्या बैठकीत कोणताही समाधानकारक तोडगा निघाला नाही. वृत्तानुसार, या बैठकीतील चर्चेचे मुद्दे दोन्ही देश आपले वरिष्ठ अधिकारी, सल्लागारांकडे मांडतील. दोन्ही देशांदरम्यान, चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. ही पुढील बैठक बेलारुस-पोलंड सीमेवर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
युक्रेनची कडवी झुंज
हल्ला केल्यानंतर युक्रेन काही दिवसात गुडघे टेकतील असा अंदाज बांधला जात होता. मात्र, युक्रेनच्या सैन्याकडून जोरदार प्रतिकार सुरू आहे. रशियन फौजा युक्रेनची राजधानी कीव्हच्या वेशीवर आहेत. मात्र, त्यांना कडव्या संघर्षाला सामोरे जावे लागत आहे.
क्रिमीया आणि डोन्बासवर पूर्ण अधिकार
रशियन सैन्याने युक्रेनमधून बिनशर्त माघार घ्यावी असे युक्रेनने म्हटले आहे. क्रिमीया आणि डोन्बास प्रांतावर युक्रेनचा पूर्ण ताबा आणि नाटोमध्ये सहभागी होण्यास रशियाने आक्षेप घेऊ नये असे युक्रेनने म्हटले आहे. तर, रशियाने म्हटले की, युक्रेनने मिन्स्क कराराचे पालन करावे, युक्रेनने नाटो गटात सहभागी होऊ नये, अमेरिकेने दबाव टाकल्यास युक्रेनने स्वत: ला अलिप्त राष्ट्र असल्याचे जाहीर करावे असे रशियाने म्हटले. मात्र, दोन्ही देश आपल्या मुद्यावर ठाम आहेत. त्यामुळे तिढा कायम आहे.