निम्बस एयरलाईस एएन-12 या कार्गो प्लेनचा दरवाजा उघडा राहिला होता आणि त्याच अवस्थेत विमानाने उड्डाण केल्यामुळे आत असलेल्या एकूण मौल्यवान धातूंपैकी एक तृतीयांश भाग विमानतळावरच्या रनवेवर पडला. रनवेवर अक्षरश: हिरे, सोन्याचा खच पडला होता.
याकुस्क विमानतळावरील ही घटना आहे. या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एका वेबसाईटच्या माहितीनुसार, संपूर्ण खजिन्याची किंमत 265 मिलियन पौंड होती. भारतीय रुपयांमध्ये हा आकडा 240 कोटींपेक्षा जास्त आहे.
क्रासनोयार्स्क जाणाऱ्या या विमानाचं विमानतळापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलं. विमानातील क्रू मेंबर्स सुरक्षित आहे. मात्र विमानातून पडलेलं किती सोनं आणि अन्य मौल्यवान धातू परत मिळाले, याचा आकडा उपलब्ध झालेला नाही.
या घटनेचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पण उड्डाण करताना विमानाच्या पंखांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दरवाजे उघडे राहिल्याचं बोललं जात आहे. ही घटना अपघात आहे की कोणाचा कट हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
पोलिसांनी रनवे सील केला असून शोधमोहीम सुरु केली आहे. केवळ सिक्रेट सर्व्हिसचे कर्मचारीच हे काम करत आहेत. तर विमानाच्या उड्डाणासाठी परवानगी देणाऱ्या टेक्निकल इंजिनीअरना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरु आहे.