फ्लोरिडा : आठपदरी हायवेवर नव्याने बांधण्यात आलेला पादचारी पूल कोसळून फ्लोरिडात मोठा अपघात झाला. पुलाच्या ढिगाऱ्याखाली आठ कार चिरडून किमान चौघांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी आहेत.
मायामी भागात 950 टन वजनाचा आणि 174 फूट लांबीचा हा पादचारी पूल बांधण्यात आला होता. फ्लोरिडा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि स्वीटवॉटर भागाला जोडणारा हा पूल गुरुवारी पडला. गेल्या शनिवारीच तो 'इन्स्टॉल' करण्यात आला होता.
14.2 मिलियन डॉलर (अंदाजे 92 कोटी रुपये) खर्च करुन बांधलेला हा पादचारी पूल पुढच्या वर्षी सुरु होणार होता. एमसीएम या मियामीतील बांधकाम कंपनीने करार जिंकला होता.
फ्लोरिडा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ हे फ्लोरिडातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं विद्यापीठ आहे. जवळपास 55 हजार विद्यार्थी इथे शिकतात.
गजबजलेला हायवे विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे ओलांडता यावा, यासाठी हा पूल बांधण्यात आला होता. ऑगस्ट 2017 मध्ये एका विद्यार्थ्याला रस्ता क्रॉस करताना जीव गमवावा लागला होता.