पॅरिस : मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार जेलमधून वेगवेगळी शक्कल वापरुन पळून गेल्याचा प्रसंग आपल्याकडील अनेक बॉलिवूड चित्रपटांत दाखवण्यात आला आहे. पण फ्रान्समधील पॅरिसमध्ये अशी घटना वास्तवात घडली आहे.


रेडॉईन फेड या दरोडेखोराला एका गुन्हात पॅरिसमधील जेलमध्ये ठेवण्यात आले होते. पण रविवारी त्याचे तीन साथिदार शस्त्रांसह हेलिकॉप्टरमधून आले आणि बघता बघता रेडॉईन फेडला  जेलमधून घेऊन गेले. सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस त्यांच्यावर गोळीबारही करु शकले नाहीत. या घटनेने फ्रान्समध्ये मोठी खळबळ माजली आहे.

दरोडेखोर फेडची जेलमधून पळून जाण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 2013 साली या कुख्यात दरोडेखोराने पोलीस सुरक्षा भेदत जेलमधून पळ काढला होता. ज्यामुळे तो फ्रान्समधील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार बनला. पोलिसांनी दोन महिन्यांनी त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या. रेडॉईन फेडने 2010 साली कॅश घेऊन जाणाऱ्या गाडीवर घातलेल्या दरोड्यासाठी त्याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती.

रेडॉईनच्या शोधासाठी आता मोठी मोहीम आखण्यात आली आहे, असं तिथल्या सरकारकडून सांगण्यात आलं आहे. रेडॉईनशिवाय अन्य कोणताही कैदी यावेळी पळून गेला नसल्याचं जेल प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, पोलिसांच्या हातावर दोनदा तुरी देणाऱ्या रेडॉईन फेडने 2010 साली एक पुस्तक प्रकाशित करत म्हटलं होतं की, ‘मी माझं आयुष्य गुन्ह्यांसाठीच समर्पित केलं आहे.’