मुंबई : कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे संपूर्ण जगाचीच जीवनशैली बदलली आहे. कोरोना व्हायरसचा प्रकोप अद्यापही सुरु आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. कोविड काळ संपून पुन्हा ‘जुने दिवस’ परत येण्यासाठी किमान आणखी दोन वर्ष जातील. म्हणजे 2022 च्या आधी आयुष्य पूर्वपदावर येणे शक्य नाही, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी केला आहे.


लोकांना असं वाटतंय की डिसेंबर-जानेवारीत लस येईल. त्यामुळे फार काळजी करण्याची आवश्यकता नाही. पण परिस्थिती तशी नसल्याचं डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलं. कोरोना संसर्ग रोखायला लस आल्याने नक्कीच मदत होईल. मात्र एवढ्या मोठ्या लोकसंख्येला लस टोचण्यासाठी किमान दोन वर्ष लागतील. त्यामुळे तोवर आपल्याला आता जशी काळजी घेत आहोत, म्हणजे मास्क, वेळोवेळी हात धुणे, हॅण्ड सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यापुढेही घेत राहावी लागणार आहे.


येत्या 2021 च्या मध्यात कोरोनावरील लस येईल. मात्र सर्वांपर्यंत लस पोहोचायला 2022 उजाडेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. 60 ते 70 टक्के लोकांना लसीमुळे रोगप्रतिकारशक्ती निर्माण होणं गरजेचं आहे. त्यामुळे लस बाजारात आली की लगेच आपण निर्धास्त होण्यासारखी परिस्थिती नाही. सध्या कोरोना व्हायरस निर्मुलनाकडे नाही तर नियंत्रणात ठेवण्यावरच भर दिला जात आहे, असंही त्या म्हणाल्या.


अद्याप हे देखील स्पष्ट नाही की कोरोनावर तयार झालेली लस किती काळ संरक्षित ठेवू शकेल, हा देखील मोठा प्रश्न आहे. प्रतिकारशक्ती किती काळ टिकेल? कोरोनाचं संकट संपवण्याऐवजी सध्या कोरोना व्हायरसवर नियंत्रण कसं ठेवलं जाईल याकडे लक्ष दिलं जात आहे, असंही डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलं.


Nagpur | रूग्णासोबतच्या व्यक्तीस मास्क घालण्यास सांगितल्यामुळे नागपुरात डॉक्टरांना बेदम मारहाण