बँकॉक : थायलंडमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून गुहेत अडकलेल्या फुटबॉल टीममधील 12 पैकी सहा मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे. गुहेत पाणी वाढण्याची शक्यता असल्याने अडकलेल्या इतर मुलांना आणि त्यांच्या कोचला वाचवण्यासाठी बचावकार्य अधिक वेगाने सुरु आहे.
एएफपीच्या माहितीनुसार, ‘गुहेतून बाहेर काढलेल्या मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुहेत अडकलेल्या इतर सहा मुलांचे बचावकार्य सुरु आहे.’ गुहा पाहण्यासाठी गेलेली 12 मुलं पुराचे पाणी गुहेत शिरल्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून अडकली आहेत.
अमेरिका, जपान, चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांतील तज्ञांची यासाठी मदत घेतली जात आहे. बचावकार्यात जवळपास तेराशे लोकांचा सहभाग आहे. “सगळ्या मुलांना गुहेतून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिका थायलंड सरकारसोबत काम करत आहे,” असं ट्वीट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.
मुलं गुहेत कशी अडकली?
थायलंडमधील एका शाळेतील 12 मुलं फुटबॉल खेळल्यानंतर आपल्या कोचबरोबर 23 जूनला ‘टॅम लूंग’ ही गुहा पाहण्यासाठी गेली. पण गुहेत पुराचं पाणी आल्याने ही सर्व मुलं तिथंच अडकून पडली. त्यानंतर नॅशनल पार्कच्या कर्मचाऱ्यांना गुहेबाहेर सायकल आणि खेळाचं काही साहित्य दिसलं. याबाबत कर्मचाऱ्यांनी स्थानिक फुटबॉल क्लबशी संपर्क साधल्यानंतर 12 शालेय मुलं आणि त्यांचे कोच गुहेत अडकल्याचं समोर आलं.
गुहेत अडकलेली ही मुलं 11 ते 16 वर्ष या वयोगटातील आहेत. तर कोचचं वय 25 वर्ष इतकं आहे. पुरपरिस्थिती लक्षात घेऊन थायलंड प्रशासनाने या मुलांना वाजवण्यासाठी बचावकार्य सुरु केलं. या गुहेची लांबी 10,316 मीटर एवढी असल्याची माहिती आहे आणि मुलं तब्बल चार किलोमीटर आतमध्ये अडकली आहेत.
थायलंड प्रशासन मोठ्या मेहनतीने या मुलांना अन्न, पाणी ,औषधं, ऑक्सिजन यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी पुरवत आहे.
‘अडकलेली मुलं बाहेर येईपर्यंत आमचे सैनिक त्यांच्यासोबत असतील, मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असून त्यांना व्हिटामिनयुक्त अन्न दिलं जात आहे,’ असं बचाव पथकाच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे.
थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या 12 पैकी सहा मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jul 2018 09:33 PM (IST)
थायलंडमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून गुहेत अडकलेल्या फुटबॉल टीममधील 12 पैकी सहा मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे. गुहेत पाणी वाढण्याची शक्यता असल्याने अडकलेल्या इतर मुलांना आणि त्यांच्या कोचला वाचवण्यासाठी बचावकार्य अधिक वेगाने सुरु आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -