इस्लामाबाद : पाकिस्तानमधील आगामी निवडणुकीपूर्वीच नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पनामागेट भ्रष्टाचारप्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना 10 वर्षं तर त्यांची मुलगी मरीयम शरीफ यांना 7 सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याआधी नवाज शरीफ यांनी आजचा निर्णय टाळण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने याचिका अमान्य करत आजच निर्णय दिला आहे.

कोर्टाने मरियमचे पती रिटायर्ड कॅप्टन सफदर यांनाही एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने बंद खोलीत नवाज शरीफ यांच्यासह त्यांची मुलगी आणि जावयाला शिक्षा सुनावली आहे. 100 पानी निकालपत्रात नवाज शरीफ यांना 73 कोटी रुपये (8 दशलक्ष पौंड) तर मरीयम यांना 18 कोटी रुपये (2 दशलक्ष पौंड) दंड ठोठावला आहे. पनामागेट प्रकरणात नवाज शरीफ यांच्याविरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. यातील एक ब्रिटनमधील लंडनमध्ये असलेल्या एवेनफील्ड अपार्टमेंटशी निगडित आहे. याचप्रकरणी शरीफ यांना 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सोबतच हे अपार्टमेंटही जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

याआधीही पनामागेट प्रकरणात पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना दोषी ठरवलं होतं. ज्यानंतर शरीफ यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. कोर्टाने शिक्षा सुनावल्यामुळे आता त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. मरीयम यांनाही सात वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांच्या राजकीय कारकीर्दीलाही ग्रहण लागू शकतं.

पाकिस्तानमध्ये याच महिन्यात 25 तारखेला सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत.

पनामा पेपर्स काय आहे?

पनामा पेपर्स सध्याचा जगभरात टॉप ट्रेडिंग टॉपिक आहे. पनामा येथील एका लॉ फर्मचे काही गोपनीय कागदपत्रे लीक करण्यात आली आहेत, त्यामुळे जगभरातील अतिश्रीमंत, बडे राजकारणी, देशांचे प्रमुख त्यांच्याकडील ब्लॅकमनी कसा सुरक्षित ठेवतात किंवा विदेशात पाठवतात याचा उल्लेख आहे. जगभरात व्हिसल ब्लोअर म्हणून चर्चेत आलेल्या एडवर्ड स्नोडेन यानेही हा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट असल्याचा दावा केलाय. हा गौप्यस्फोट करण्यात एडवर्ड स्नोडेनचा मात्र काही सहभाग नाही. 11 दशलक्ष म्हणजे तब्बल एक कोटी दहा लाख पानांचा गोपनीय दस्तावेज या शोध पत्रकारांच्या हाती लागले. गेले वर्षभर जगभरातील अनेक शोध पत्रकार या मोहीमेवर काम करत होते. परदेशी पैसे पाठवणं हे बेकायदेशीर नाही, मात्र काही देशांचे प्रमुखच जेव्हा त्यांच्याकडील अतिरिक्त पैसा असा विदेशात छुप्या मार्गाने पाठवतात, तेव्हा नक्कीच संशयास्पद आणि आक्षेपार्ह असतं. यामध्ये 128 राजकारणी आणि बडे अधिकारी यांच्यासह तब्बल 12 देशांचे प्रमुखांचीही नावे आहेत.

पनामा पेपर्समध्ये कोणाकोणाची नावं?

जगभरातील अतीश्रीमंत सत्ताधीश, राजकारणी आणि उद्योगपती यांनी आपला ब्लॅकमनी कसा परदेशी पाठवला आहे, याचा खुलासा या पनामा पेपर्समधून करण्यात आलाय. जगभरातील हुकूमशहा आणि सत्ताधीशांच्या यादीत रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचंही नाव आहे. त्याशिवाय युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को, इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक, लिबियाचे मोहम्मद गडाफी, सिरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांचा समावेश आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांचे कुटुंबीय, आईसलँडचे पंतप्रधान तसंच सौदी अरेबियाचे राजे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या काळ्या पैशाबाबत पनामा पेपर्समध्ये उल्लेख आहे.