कोलंबो: युनायटेड नॅशनल पार्टीचे नेते रानिल विक्रमसिंघे हे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान असतील. श्रीलंकेच्या 225 सदस्यांच्या संसदेत रानिल विक्रमसिंघे यांच्याकडे केवळ एकच जागा आहे, तरीही ते नवे पंतप्रधान असतील. 


आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला असून त्याच पार्श्वभूमीवर महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. आता ही जबाबदारी रानिल विक्रमसिंघे यांच्याकडे आली आहे. 


 






रानिल विक्रमसिंघे या आधी श्रीलंकेचे चार वेळा पंतप्रधान राहिले आहेत. ऑक्टोबर 2018 साली तत्कालीन राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी त्यांना पदावरुन हटवलं होतं. आता देश आर्थिक संकटात असताना ही जबाबदारी पुन्हा एकदा त्यांच्याकडे आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी श्रीलंका पोदुजाना पेरामुना, विरोधी पक्ष जन बालावेगाया आणि इतर लहान पक्षांनी रानिल विक्रमसिंघे यांना पाठिंबा दिला आहे. 


श्रीलंकेत परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर गेली असून या देशाचा यादवीकडे प्रवास सुरू आहे. श्रीलंकेमध्ये होत असलेला हिंसाचार पाहता संरक्षण मंत्रालयाने लष्कराला गोळीबाराचा आदेश दिला आहे. जे नागरिक सरकारी मालमत्तेचं नुकसान करत असतील किंवा जे नागरिक हिंसाचारामध्ये भाग घेत असतील त्यांना थेट गोळ्या घाला असा आदेश श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाने लष्कराला दिला आहे. श्रीलंकेतील हिंसाचार पाहता मंगळवारी सकाळीच कर्फ्यु लावण्यात आला आहे. 


सोमवारी महिंदा राजपक्षे यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मोठ्या हिंसाचाराच्या घटना घडल्या. सोमवारी रात्री हंबनटोटा येथील महिंदा राजपक्षे यांच्या वडिलोपार्जित घराला आंदोलकांनी आग लावल्याची घटना घडली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.