श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. यात भारतीय सैन्याचा एक जवानही शहीद झाला आहे. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात सुधीश कुमार शहीद झाले आहेत. गेल्या 24 तासात दोनवेळा नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे.


जम्मूच्या राजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ रविवारी सकाळी आणि संध्याकाळी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. भारतीय सैन्याकडूनही याला चोख प्रत्यूत्तर देण्यात आलं. यावेळी पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात 6 राजपूत रेजीमेंटचे सुधीश कुमार शहीद झाले आहेत.

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरु आहे. नौशेराजवळच नियंत्रण रेषा पार करुन भारतीय सैन्यानं 28 सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राईक करत 38 ते 40 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं.