Rafale Deal : राफेल विमान खरेदी प्रकरणात नवी खुलासा समोर आला आहे. या खरेदीदरम्यान, फ्रेन्च कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने 2007 ते 2012 च्या दरम्यान भारतीय मध्यस्थाला 7.5 मिलियन युरो (जवळपास 64 कोटी रुपये)  दिल्याचा खळबळजनक दावा फ्रेंचमधील एका संकेतस्थळानं केलाय. या मध्यस्थाचं नाव सुशेन गुप्ता असल्याचेही संकेतस्थळामध्ये सांगितलं आहे.

  


36 राफेल विमानाचा व्यवहार सुरळीतपणे व्हावा, यासाठी फ्रेन्च कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने सुशेन गुप्ता या मध्यस्थाला 2007 ते 2012 या काळात 7.5 मिलियन युरो कमिशन दिले. त्यासाठी बनावट इनव्हॉइसही तयार करण्यात आले. याबाबतची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. मात्र, तपास यंत्रणांनी कोणताही चौकशी केली नाही, असा दावाही फेंच संकेतस्थळानं केलाय. फ्रान्समधील मीडियापार्ट (Mediapart.fr) वेबसाइटने रविवारी याबाबतचं वृत्त दिलं आहे.  राफेल विमान खरेदी व्यवहारात विदेशी कंपन्या, संशयास्पद कंत्राटे आणि बनावट इनव्हॉइसचा समावेश असल्याचा दावाही मीडियापार्टनं आपल्या वृत्तात केलाय. 


मीडियापार्टच्या दाव्यानुसार, डसॉल्ट एव्हिएशनने सुशेन गुप्ता या मध्यस्थाला जवळपास 64 कोटी रुपयांचं कमिशन दिलं. याचे सर्व पुरावे सीबीआय आणि ईडी यांच्याकडे ऑक्टोबर 2018 पासून होते. तरीही या तपास संस्थांनी चौकशी न करण्याचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती देऊ शकतो, असा दावा मीडियापोर्ट संकेतस्थळानं केलाय. मीडियापोर्टच्या या दाव्यावर भारताकडून अथवा डसॉल्ट एव्हिएशनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.  दरम्यान, भारत आणि फ्रान्स या दोन देशांच्या दरम्यान राफेल या लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार 2016 साली झाला होता. या करारानुसार, भारत फ्रान्सकडून 36 लढाऊ विमान खरेदी करणार आहे. त्यापैकी काही विमाने भारतीय वायू दलाच्या ताफ्यात आली असून बाकीची विमाने ही पुढच्या वर्षीपर्यंत येणार आहेत. 


विरोधकांनी केली होती टीका -
गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्ष काँग्रेसने सरकारवर राफेलच्या व्यवहारावरून टीका केली होती. या व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचं सांगत विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरलं होतं. पण नंतर सर्वोच्च न्यायालयाने राफेलचा व्यवहार हा कायदेशीर असल्याचं  सांगत या व्यवहाराला हिरवा झेंडा दाखवला होता आणि विरोधकांच्या आरोपातील हवा काढून घेतली होती.


भाजपनं साधला निशाणा -
राफेल विमान घोटळ्याप्रकरणी विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरलं होतं. मात्र, आता मीडियापार्ट (Mediapart.fr) वेबसाइटने दिलेल्या माहितीनंतर भाजपनं काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, 2013 च्या आधी राफेल डीलसाठी 65 कोटी रुपयांची लाच दिली होती. त्यावेळी कोणाचं सरकार होतं, हे सर्वांना माहित आहे.