लाहोर : सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची हत्या झाली आहे. कंदीलच्या भावानेच तिची गोळ्या घालून हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. पाकिस्तानच्या मुलतान शहरात हा थरार रंगला.
काही दिवसांपूर्वीच कंदीलने मुस्लिम धर्मगुरु मुफ्ती अब्दुल कवी यांच्यासोबत काढलेला सेल्फी ट्विटर, फेसबुकवर स्वतःच शेअर केला होता. त्यामुळे चांगलाच वाद रंगला होता.
कंदील आणि मौलवी यांचा फोटो लगेच व्हायरल झाला, त्यानंतर पाकिस्तानी मीडियात खळबळ माजली होती. इतकंच नाही तर दोघांचा व्हिडिओही तिने शेअर केला. रमजानच्या काळात कंदील आणि कवी एका इफ्तार पार्टीनिमित्त हॉटेलात भेटले होते. त्यावेळी धर्मगुरुंची टोपी घालून कंदिलने दोघांचा सेल्फी घेतला होता.
नुकतंच कंदील बलोचने तीन वेळा लग्न केल्याचा दावा तिच्या घटस्फोटित पतीने केला होता. पेशावरच्या शाहिद बलोचने पूर्व पत्नी फौजिया उर्फ कंदीलने दोन नव्हे, तीन वेळा लग्न केल्याचा गौप्यस्फोट केला.
कुटुंबाच्या संमतीविना कंदीलने आपल्याशी कोर्टात लग्न केलं होतं, असा खुलासा त्याने केला आहे. 13 वर्षांपूर्वी आपण कंदीलशी विवाहबद्ध झालो होतो, हे तिचं दुसरं लग्न होतं, अशा खळबळजनक दावा त्याने केलाय.
काहीच दिवसांपूर्वी कोट अड्डूतील आशिक हुसेन नामक व्यक्तीने कंदीलसोबत आपण 2008 मध्ये लग्न केल्याचा दावा केला होता. त्यानंतर 2009 मध्ये तिने एका मुलाला जन्म दिल्याचंही त्याने म्हटलं होतं. कंदीलने मात्र हे लग्न जबरदस्ती लावल्याचा आरोप केला होता.
कंदीलने आपल्या रक्ताने लिहिलेली पत्रं आपल्याकडे असल्याचंही आशिकने म्हटलं आहे. तिच्याशी लग्न झाल्यानंतर आपलं सात लाखांचं नुकसान झाल्याचा दावाही त्याने केला आहे.