मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकांचे वातावरण असताना मूळ पुण्याचे असलेले योगेंद्र पुराणिक उर्फ योगी हे जपानमधील निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत. योगी हे जपानच्या निवडणुकांमधील पहिलेच भारतीय उमेदवार ठरले आहेत.
जपानमधील महापालिका (कुगीकाई) निवडणुकीचं तिकीट योगेंद्र पुराणिक यांना मिळालं आहे. भारतीय नागरिक जपानला स्थायिक होण्यास सुरुवात झाल्यापासून पुराणिक हे निवडणूक लढवणारे पहिलेच भारतीय ठरले आहेत.
बिगर जपानी आणि स्थानिक जपानी नागरिक यांच्यातला दुरावा कमी होऊन एकोपा वाढावा, जपानी स्थानिक शाळांमध्ये इंग्रजी भाषेला वाव मिळावा, जपानमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या पेन्शनचा प्रश्न सुटावा, यासाठी आपण राजकारणात आल्याचं योगी यांनी सांगितलं.
योगेंद्र पुराणिक हे कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ जपान ( CDP)या पक्षाकडून लढत आहेत. हा पक्ष जपानमधील मोठा विरोधी पक्ष आहे. टोक्योमध्ये एकूण 23 महापालिका आहेत. त्यापैकी एदोगावा मतदारसंघातून योगी निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात एकूण साडेचार हजारांपेक्षा जास्त भारतीय आणि इतर स्थानिक जपानी नागरिकांचा पाठिंबा आपल्याला आहे, असा विश्वास योगेंद्र यांनी व्यक्त केला आहे.
योगेंद्र हे मूळ पुण्याचे असून 1997 साली ते शिक्षणानिमित्त जपानला गेले. त्यानंतर 2001 पासून त्यांनी आयटी क्षेत्रात तीन वर्ष काम केलं, तर दहा वर्ष बँकिंग क्षेत्रात नोकरी केल्यानंतर ते जपानच्या राजकारणात उतरले आहेत.
21 एप्रिलला या निवडणुकांसाठी मतदान होणार असून 22 एप्रिलला निकाल जाहीर होणार आहे. भारतीय वंशाच्या या उमेदवाराकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
पुण्याचे योगेंद्र पुराणिक जपानमध्ये निवडणूक लढवणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Apr 2019 10:33 AM (IST)
जपानमधील महापालिका (कुगीकाई) निवडणुकीचं तिकीट योगेंद्र पुराणिक यांना मिळालं आहे. भारतीय नागरिक जपानला स्थायिक होण्यास सुरुवात झाल्यापासून पुराणिक हे निवडणूक लढवणारे पहिलेच भारतीय ठरले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -