Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी शनिवारी रात्री एका भाषणादरम्यान पाकिस्तान पोलीस आणि न्यायाधीशांना धमकी दिली. यानंतर पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटी (PEMRA) ने तत्काळ इम्रान खान यांच्या भाषणाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातली. पोलिसही कायदेशीर कारवाई करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेंजर्सना अलर्टवर ठेवण्यात आले असून इम्रान खांना कधीही अटक केली जाऊ शकते.
PEMRA नुसार इम्रान खान यांनी घटनेच्या कलम 19 चे उल्लंघन केले आहे. इम्रान खान देशाच्या लष्कर, पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर सातत्याने बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांची भाषणे द्वेष पसरवणारी आहेत.
काय म्हणाले इम्रान?Shahbaz Gill
20 ऑगस्ट रोजी इस्लामाबादमधील F9 पार्क येथे आयोजित रॅलीदरम्यान इम्रान म्हणाले की, पाकिस्तानचे पोलिस कोणाच्या तरी सांगण्यावरून माझ्या पक्षाच्या नेत्यांना अटक करत आहेत. शाहबाज गिलला अटक का करण्यात आली आहे, असे मी पोलिसांना विचारले असता पोलिसांनी सांगितले की, ते केवळ आदेशाचे पालन करत आहेत.
महिला न्यायाधीशांनाही धमकी दिली
एवढेच नाही तर खान यांनी एका महिला न्यायाधीशावर पक्षपाती असल्याचा आरोप केला आणि बघून घेण्याची धमकी दिली. ते म्हणाले की, न्यायपालिकेनेही परिणामांसाठी स्वत:ला तयार ठेवावे. गिलला रिमांडवर घेण्याचे आदेश देणाऱ्या महिला न्यायाधीशांनाही खान यांनी धमकावत न्यायाधीशांवरही कारवाई केली जाईल, असे सांगितले.
शाहबाज गिल इम्रान खान यांचे जवळचे मित्र
शाहबाज गिल यांना पोलिसांनी 9 ऑगस्टला अटक केली होती. अटक झाली त्यावेळी गिल एका आलिशान कारमधून इम्रान खान यांच्या घरी बनीगाला येथे जात होते. त्यांनी यापूर्वीही पाकिस्तानी लष्कर आणि न्यायव्यवस्थेबाबत अत्यंत वाईट विधाने केली होती. यामुळे लष्कर आणि सरकार नाराज झाले होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यावेळी पोलिस इम्रान खान यांनाही अटक करू शकतात, असे मानले जात होते.
इम्रान खान यांना विदेशी निधी प्रकरणी अटकही होऊ शकते
पाकिस्तानी न्यूज वेबसाईट द न्यूजनुसार, भारतासह अनेक देशांकडून बेकायदेशीरपणे फंडिंग केल्याप्रकरणी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एफआयए) इम्रान खान यांना अटक करू शकते. एफआयए इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयच्या निधी आणि खात्यांचीही चौकशी करू शकते. यासाठी एजन्सी न्यायालयाची परवानगी घेऊ शकते. जर इम्रान खान चौकशी समितीसमोर हजर झाले नाही किंवा बेकायदेशीर निधी प्रकरणी नोटीसला उत्तर दिले नाही तर अटक केली जाईल.
वृत्तानुसार, इम्रान खान यांना 3 नोटिसा दिल्यानंतर अटक करण्याचा अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यांना दुसरी नोटीस शुक्रवारी देण्यात आली. 'जिओ न्यूज'नुसार, इम्रानच्या अटकेसाठी पाकिस्तानच्या एलिट सुरक्षा युनिट रेंजर्सला अलर्टवर ठेवण्यात आले आहे.