मुंबई : अदानी विलमार कंपनीच्या प्रस्तावित खाणींना विरोध करण्यासाठी ऑस्ट्रेलियात विविध शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली. राजधानी सिडनीसह, ब्रिस्बेन, मेलबर्न, गोल्डकोस्ट आणि पोर्ट डग्लसमध्ये हजारो नागरिकांनी अदानींच्या खाणींना विरोध केला आहे.
वेस्टर्न क्वीन्सलँडमध्ये होऊ घातलेल्या या खाणी ऑस्ट्रेलियाचं पर्यावरण दूषित करणार असल्याचा आरोप निदर्शन करणाऱ्या नागरिकांनी केला आहे. इतकंच नाही, तर या खाणींमुळे दी ग्रेट बॅरियर रीफमधल्या समुद्राखालची जैवविविधता नष्ट होणार असून, हा प्रकल्प ग्लोबल वॉर्मिंगलाही हातभार लावत असल्याचा दावा आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला होता, पण प्रत्यक्षात तसं होणार नसल्याचा दावाही आंदोलकांनी केला आहे. फोर कॉर्नर्सच्या टीमने ऑस्ट्रेलियन न्यूज चॅनल एबीसीच्या माध्यमातून अदानी कंपनीचा भारतातला इतिहास जगासमोर आणल्यानंतर या प्रकल्पाला विरोध वाढला आहे.