Prophet Remarks Row: भाजपच्या दोन माजी नेत्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादात चीननेही उडी घेतली आहे. चीनने म्हटले आहे की, ''म्हाला अशा आहे की या घटनेला योग्य पद्धतीने हाताळले जाईल. "विविध सभ्यता, भिन्न धर्मांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे.''


भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांनी केलेल्या कथित टिप्पण्यांविरोधातील निषेधांवर चीनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले, ''आम्ही संबंधित बातम्या पाहिल्या आहेत. आम्हाला आशा आहे की संबंधित घटनेला योग्य प्रकारे हाताळले जाईल.'' ते म्हणाले की, ''अहंकार आणि पूर्वग्रह सोडून देणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने एकमेकांच्या धर्माचा आदर केला पाहिजे.''


तत्पूर्वी, प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या कथित वक्तव्याबद्दल भाजपने 5 जून रोजी आपल्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित केले. तसेच दिल्ली युनिटचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांची हकालपट्टी केली. त्यांनी केलेल्या टिप्पणीवर मुस्लिम गटांच्या निषेधाच्या दरम्यान, पक्षाने अल्पसंख्याकांच्या चिंतांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने एक निवेदन जारी केले आणि म्हटले की ते सर्व धर्मांचा आदर करतात.


भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केले निवेदन


भारत सर्व धर्मांना सर्वोच्च सन्मान देतो, असे परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जरी करत म्हटले होते. मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, धार्मिक व्यक्तिमत्त्वाची बदनामी करणारे आक्षेपार्ह ट्वीट आणि टिप्पण्या काही विशिष्ट व्यक्तींनी केल्या होत्या. ते कोणत्याही प्रकारे भारत सरकारच्या विचारांचे प्रतिबिंबित करत नाहीत आणि संबंधित संस्थांनी या व्यक्तींवर कठोर कारवाई केली आहे. दरम्यान, चीन आपल्या शिनजियांग प्रांतात उइगर मुस्लिमांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करत असल्याचे आरोप आहेत. मात्र चीनने हे आरोप फेटाळून लावले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Britain : महाराणी एलिझाबेथ यांची सत्तेची 'सत्तरी'; राणी म्हणून 70 वर्षांची कारकीर्द पूर्ण
Kuvait : नुपूर शर्माविरोधात कुवैतमध्ये आंदोलन; आंदोलकांना प्रशासन माघारी पाठवणार, जाणून घ्या कारण