Kuwait To Deport Protestor :  प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात कुवैतमध्ये आंदोलन करणाऱ्या अनिवासी नागरिकांना प्रशासन पुन्हा मायदेशी माघारी पाठवणार आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याबाबत कुवैतने भारतीय दूतावासाला समन्स धाडत खुलासा मागितला होता. 


'अरब टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, आखाती देश कुवैतमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय आणि पाकिस्तानी नागरीक काम करतात. नोकरीनिमित्ताने स्थायिक झालेल्या व्यक्तींनी आंदोलन आणि मोर्चे काढणे हे बेकायदेशीर आहे. मात्र, तरीदेखील आंदोलन करण्यात आले. आता कुवैत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून या नागरिकांना ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना डिपोर्टेशन सेंटरमध्ये पाठवण्यात येणार आणि तेथून मायदेशी धाडण्यात येणार आहे. इतकंच नव्हे तर या नागरिकांना पुन्हा कुवैतमध्ये येण्यास बंदी घातली जाणार आहे. 


कुवैत अधिकाऱ्यांनी सांगितले की, रोजगारासाठी आलेल्या सर्व नागरिकांना कुवैतच्या कायद्याचा सन्मान करावा लागणार आहे. त्याशिवाय त्यांना कोणत्याही प्रकारच्या आंदोलनापासून दूर राहावे लागणार आहे. दरम्यान,  या आंदोलनात कोणत्या देशांचे नागरीक सहभागी होते, याची माहिती मिळाली नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत 40 हून अधिकजण नुपूर शर्माविरोधात निदर्शने करताना दिसत आहेत. या निदर्शनात भारतीय, पाकिस्तानी आणि बांगलादेशी सहभागी असल्याची चर्चा आहे. 


आगामी काळात रोजगारासाठी कुवैतमध्ये दाखल झालेल्या नागरीकांनी कोणत्याही प्रकारचे आंदोलन करू नये अथवा अशा प्रकारच्या बाबींमध्ये सहभागी होऊ नये यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे कुवैतच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. 


कुवैतकडून नुपूर शर्माच्या वक्तव्यावर नाराजी


दरम्यान, याआधी नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे आखाती देशात पडसाद उमटले होते. त्यानंतर कुवैतने भारतीय राजदूताला समन्स धाडत या वक्तव्याचा निषेध केला होता. भारतीय दूतावासाने नुपूर शर्माच्या वक्तव्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले. कुवैत सरकारने यावर समाधानही व्यक्त केले होते.