मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन (सीएए) देशभरात विरोध तसंच आंदोलनं सुरु असताना मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन भारतात जे होतंय ते दु:खद आहे, असं मत सत्या नडेला यांनी व्यक्त केलं. अमेरिकेतील मॅनहॅटन शहरात संपादकांसोबत झालेल्या एका बैठकीत नडेला यांना भारतातील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं.


सीएएबाबत मत व्यक्त करताना नडेला म्हणाले की, "जे काही सुरु आहे ते दु:खद आहे. हे चुकीचं आहे. मला एखाद्या बांगलादेशी शरणार्थीला भारतात स्टार्टअप उभं करताना किंवा इन्फोसिसचा सीईओ झाल्याचं पाहण्याची इच्छा आहे."  सीएएबाबत विचारलेल्या प्रश्नाला भारतीय वंशाचे सत्या नडेला यांनी हे उत्तर दिल्याचं BuzzfeedNews या वेबसाईटचे मुख्य संपादक बेन स्मिथ यांनी ट्विटर सांगितलं.


या बैठकीत सत्या नडेला यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, "तुमच्या (मायक्रोसॉफ्ट) सारख्या कंपन्यांना सरकारसोबत व्यवहार करण्यासाठी मोठा दबाव सहन करावा लागत आहे. मला जाणून घ्यायला आवडेल की, भारताच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत तुमचं काय मत आहे? तसंच सरकार ज्याप्रकारे आकड्यांचा वापर करत आहे, त्यावरुन तुम्हाला भारत सरकारसोबत काम करण्यात अडचणी येत आहेत का?

यावर उत्तर देताना सत्या नडेला म्हणाले की, "एखाद्या देशाला आपल्या राष्ट्रीय सुरक्षेची काळजी करायला हवी की नाही हे मी सांगत नाही. देशांमध्ये सीमा असतात आणि ही सत्यपरिस्थिती आहे. माझ्या बोलण्याचा अर्थ आहे की इमिग्रेशनन हा या देशाचा (अमेरिका) मुद्दा आहे. हा युरोप आणि भारताचाही मुद्दा आहे. पण इमिग्रेशन काय आहे, निर्वासित कोण आहेत?, अल्पसंख्यांक समूह कोणता आहे, हे कोण आणि कशाप्रकारे निश्चित करतं हे लक्षात घेणंही तेवढंच महत्त्वाचं आहे.

सत्या नडेला यांनी आपलं म्हणणं समजावून सांगण्यासाठी स्वत:चं उदाहरणही दिलं. ते म्हणाले की, "भारतात टेक्नॉलॉजीला मिळालेलं बळ आणि अमेरिकेची इमिग्रेशन पॉलिसी यामुळेच मी एका जागतिक कंपनीचा सीईओ बनलो आणि अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं." नडेला यांनी यावेळी भारताच्या सर्वसमावेशक संस्कृतीचाही उल्लेख केला.

सीएएवरुन देशभरात वादंग सुरु असताना, विरोधकांसह अनेक सेलिब्रिटी मोदी सरकारला लक्ष्य करत असताना, मायक्रोसॉफ्टच्या सीईओंचं हे मत अतिशय महत्त्वाचं आहे.

रामचंद्र गुहांकडून सत्या नडेला यांचं कौतुक


दरम्यान, इतिहासकार रामचंद्र गुहा यांनीही सत्या नडेला यांच्या वक्तव्याचं स्वागत केलं आहे. त्यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे की, सत्या नडेला यांना जे जाणवलं ते मत त्यांनी व्यक्त केलं. मी खुश आहे. ही काही मैं खुश हूं कि सत्य नडेला ने वो कहा जो वो महसूस करते थे. हे शहाणपणाचं वक्तव्य आहे. रामचंद्र गुहा यांनी याआधीही सीएएविरोधात केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सोबतच आयटी क्षेत्रातील इतरांनी याविरोधात बोलण्याचं धाडस दाखवण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं.