Harry Meghan Welcome Baby Girl: ब्रिटनच्या राजघराण्यातील डचेस ऑफ ससेक्स मेगन मार्कल यांना दुसऱ्यांदा मातृत्त्वचं सुख अनुभवायला मिळत आहे. प्रिन्स हॅरी यांची पत्नी मेगन मार्कल यांनी एका मुलीला जन्म दिला असून, तिचं नाल लिलिबेट डायना असं ठेवण्यात आलं आहे. ब्रिटीश राजघराण्यामध्ये मागील काळात उदभवलेल्या वादळाच्या परिस्थितीनंतर आता राजघराण्यातील या नव्या पाहुणीचा जन्म कॅलिफोर्निया येथे झाला. 


लिली हे नाव मुलीची पणजी म्हणजे, राणी एलिझाबेथ यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं. लिलिबेट या नावानं राणी एलिझाबेथ यांना कुटुंबात प्रेमानं संबोधण्यात येतं. तर मुलीचं डायना हे नाव तिच्या आजीवरून म्हणजे प्रिन्स हॅरी यांच्या दिवंगत आईच्या नावारुन ठेवण्यात आलं आहे. प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना, यांना या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून ही माहिती दिली. 


नायजेरियात Twitter वर अनिश्चित काळासाठी बंदी, राष्ट्रपतींचे ट्वीट डिलिट केल्याचा परिणाम भोवला


प्रिन्स हॅरी आणि मेगन यांचं दुसरं पालकत्त्व 
प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मेगन यांनी एका सुदृढ बालकाला जन्म दिला. रविवारी याबाबतची अधिकृत घोषणा करत या दाम्पत्यानं त्यांचं दुसरं मुल, लिलिबेट लिली डायना माऊंटबेटन विंडसर हिचं स्वागत केल्याचं सांगितलं. राजघराण्यातील ही लाडाची लेक प्रिन्स हॅरी आणि मेगन यांचं दुसरं बाळ आहे. 


शाही कुटुंबाकडून ही आनंदवार्ता सर्वांनाच देण्यात आलेली असली तरीही बाळाचा फोटो मात्र अद्यापही माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. ब्रिटनच्या राजघराण्यापासून प्रिन्स हॅरी यांनी काहीसा दुरावा पत्करलेल्या असल्याच्या काळातच त्यांच्या मुलीचा जन्म झाला आहे. असं असलं तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक हितचिंतकांनी प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.