अबुजा : ट्विटरने भारतातील उपराष्ट्रपतींचे ट्विटर अकाऊंट अनव्हेरिफाईड केल्याची घटना चर्चेत असताना तिकडे नायजेरियात थेट ट्विटरवर बंदी आणण्यात आली आहे. नायजेरियाच्या राष्ट्रपतींचे एक ट्वीट डिलिट करणं ट्विटरला चांगलंच महागात पडलं आहे. नायजेरियाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ट्विटरवर अनिश्चित काळासाठी बंदी आणल्याचं जाहीर केलं आहे.


देशाच्या सार्वभौमत्वाला कमी लेखण्यासाठी ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साईटचा वापर केला जात आहे असं नायजेरिया सरकारकडून सांगण्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वी नायजेरियांचे राष्ट्रपती मोहम्मदु बुहारी यांनी नागरी युद्धासंबंधी एक ट्वीट केलं होतं. त्यावर ट्विटरने नियमांचा संदर्भ देऊन ते ट्वीट डिलिट केलं होतं. त्यामुळेच नायजेरिया सरकार ट्विटरवर नाराज होतं. 


 






राष्ट्रपतींचे ट्वीट डिलिट केल्यानंतर देशभरातील विविध घटकांमधून ट्विटरवर बंदी आणावी अशी मागणी करण्यात येत होती. त्यामुळे नायजेरिया सरकारने आता ट्विटरवर अनिश्चित काळासाठी बंदी आणण्याची घोषणा केली आहे. पण नायजेरिया सरकारने ही बंदी आणताना कोणतेही अधिकृत कारण सांगितलं नाही. माहिती आणि प्रसारण खात्याच्या प्रवक्त्यांनी आपण याबाबत तांत्रिकदृष्ट्या उत्तर देऊ शकत नाही असं स्पष्ट केलं  आहे. 


नायजेरियाच्या साऊथ-ईस्ट भागामध्ये झालेल्या हिंसेवरुन राष्ट्रपती मोहम्मदु बुहारी यांनी एक ट्वीट केलं होतं. राष्ट्रपती मोहम्मदु बुहारी हे नायजेरियाच्या सैन्याचे माजी जनरल होते. नायजेरियात पोलिसांच्या अत्याचाराच्या विरोधात  #EndSARS हे अभियान ट्विटरच्या माध्यमातून सुरु आहे. त्यावरुन ट्विटरने फुटिरवादी नेत्यांना प्रोत्साहीत करत असल्याचा आरोप नायजेरिया सरकारने ट्विटरवर केला होता. ट्विटरची ही कृती सहन केली जाणार नाही असा इशाराही नायजेरियाच्या सरकारने केला होता.  


महत्वाच्या बातम्या :