लंडन : ब्रिटनच्या राजघराण्यात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल यांना 6 मे रोजी मुलगा झाला. हा 'रॉयल बेबी' ब्रिटनच्या राजगादीच्या वारसदारांच्या यादीत सातव्या क्रमांकावर असेल. क्वीन एलिझाबेथ यांचे द्वितीय पुत्र बाळाच्या आगमनामुळे आठव्या क्रमांकावर गेले आहेत.


क्वीन एलिझाबेथ यांचे ज्येष्ठ पुत्र प्रिन्स चार्ल्स (प्रिन्स ऑफ वेल्स) हे पहिले उत्तराधिकारी आहेत. क्वीन एलिझाबेथ यांचा सर्वात मोठा नातू अर्थात प्रिन्स चार्ल्स यांचे पुत्र प्रिन्स विल्यम्स (ड्यूक ऑफ केंब्रिज) हे राजगादीचे दुसरे वारसदार ठरतात.

तिसरा क्रमांक लागतो क्वीन एलिझाबेथ यांचा सर्वात मोठा पणतू, अर्थात प्रिन्स विल्यम्स यांचा मोठा मुलगा प्रिन्स जॉर्ज (ऑफ केंब्रिज) याचा.  प्रिन्स जॉर्ज आता सहा वर्षांचा होईल. त्यापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर आहे त्याची धाकटी बहीण प्रिन्सेन शार्लेट (ऑफ केंब्रिज). ती चार वर्षांची आहे. तर पाचव्या क्रमांकाचा वारसदार आहे जेमतेम एक वर्षांचा प्रिन्स ल्युईस (ऑफ केंब्रिज).

राजघराण्याचा सहावा वारसदार आहे प्रिन्स हॅरी. प्रिन्स हॅरी हे प्रिन्स चार्ल्स यांचे दुसरे सुपुत्र, म्हणजेच प्रिन्स विल्यम्स यांचे धाकटे बंधू. त्यांच्यानंतर नव्याने जन्मलेलं बाळ सातव्या क्रमांकाचं वारसदार ठरतं. बाळाच्या जन्मामुळे क्वीन एलिझाबेथ यांचे द्वितीय पुत्र प्रिन्स अँड्र्यू हे आठव्या क्रमांकाचे उत्तराधिकारी झाले आहेत, तर तृतीय पुत्र प्रिन्स एडवर्ड हे अकराव्या स्थानी आहेत.

हॅरी हे ड्यूक ऑफ ससेक्स, तर मेगन मार्कल या हर रॉयल हायनेस द डचेस ऑफ ससेक्स म्हणून ओळखले जातात. ब्रिटनच्या राजघराण्यातील नवा पाहुणा क्वीन एलिझाबेथ यांचं आठवं पतवंड ठरलं आहे.