रिओ दी जनेरो : चमत्कार कधीतरी घडतात. याचा प्रत्यय ब्राझीलमधील एका कुटुंबाला आला. हे कुटुंब एकीकडे आईच्या जाण्याचं दु:ख करतंय तर त्याचवेळी आश्चर्यकारकरित्या जगलेल्या जुळ्या मुलांच्या जन्माचा आनंदही साजरा करत आहे. कारण फ्रँकिएलेन दे सिल्वा झाम्पोली पजिल्या ह्या गर्भवती ब्रेन डेड महिलेने 123 दिवसांनी जुळ्या मुलांना जन्म दिला.


9 आठवड्यांची गर्भवती असलेल्या फ्रँकिएलेनचा मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये ब्रेनहॅमरेजमुळे मृत्यू झाला. पण तिच्या गर्भातील बाळांच्या हृदयाचे ठोके सुरु असल्याचं डॉक्टरांना समजलं. फ्रँकिएलेन ब्रेन डेड होती, परंतु तिचं शरीर अजूनही न जन्मलेल्या बाळांचं पालनपोषण करत होतं.

नोसो सेन्होरा दो रोसिओ या रुग्णालयाच्या स्टाफने ह्या ब्रेन डेड आईची रुम सजवली. ते गर्भातील मुलांसाठी गाणी गायचे, गर्भाशयात वाढणाऱ्या भ्रूणांशी बोलायचे.

"आई ब्रेन डेड झाल्यामुळे गर्भाशयातील भ्रूणांच्या जगण्याची शाश्वती नव्हती. पण अल्ट्रासाऊंड केल्यानंतर दोन्ही भ्रूण जिवंत असल्याचं पाहिल्यावर आम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला," असं फ्रँकिएलेनवर उपचार करणारे डॉक्टर डॉल्टन रिवाबेम यांनी सांगितलं.

फ्रँकिएलेनचे सर्व अवयव व्यवस्थित आणि सुरळीत काम करत होते. त्यामुळे तिच्या गर्भाशयातील न जन्मलेल्या मुलांना वाचवण्यासाठी तिला जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वाढीवर आमचं कायमच लक्ष असायचं, असंही डॉक्टर म्हणाले.

123 दिवसांनंतर म्हणजेच सातव्या महिन्यात सीझेरियनद्वारे फ्रँकिएलेनने जुळ्या मुलांना जन्म दिला. ज्यामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांना तीन महिने इक्युबेटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. आता ही जुळी मुलं वडील म्युरिएल पजिल्या आणि आजी ऍअँजेला सिल्वा यांच्यासोबत राहतात.

"मला माझ्या मुलीचा अभिमान आहे. तिला गमावणं फार कठीण होतं, पण ती एखाद्या योद्ध्याप्रमाणे आपल्या सुंदर मुलांचं रक्षण करत अखेरच्या श्वासापर्यंत लढली," असं अँजेला म्हणाल्या.

तर फ्रँकिएलेनचा आत्मा अजूनही माझ्याशी बोलतो, असं म्युरिएल पजिल्या यांचं म्हणणं आहे. "मी आता सुंदर ठिकाणी आहे. तुझ्यावर आता मोठी जबाबदारी आहे, आपल्या दोन्ही मुलांची काळजी तुलाच घ्यायची आहे. तुला आणखी कणखर होऊन पुढील आयुष्य जगायचं आहे," असं फ्रँकिएलेन बोलल्याचं म्युरिएल पजिल्या यांनी सांगितलं.

दरम्यान, मुलांच्या जन्मानंतर फ्रँकिएलेनची लाईफ सपोर्ट सिस्टम काढण्यात आली. यानंतर कुटुंबाने तिला अखेरचा निरोप दिला.