बीजिंग : चीनच्या सरकारी मीडियाने एका ताज्या लेखात अप्रत्यक्षरित्या भारताला धमकी दिली आहे. "पाकिस्तानने विनंती केल्यास काश्मीरमध्ये 'तिसऱ्या देशाचं' सैन्य घुसू शकतं," अशी गरळ चीनी वृत्तपत्राने ओकली आहे.
चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने लिहिलं आहे की, "ज्या प्रकारे भूतानच्या दिशेने सिक्किमच्या डोकलाममध्ये रस्ता बनवण्यापासून भारतीय सैनिकांनी चिनी सैन्याला रोखलं, त्याच तर्कावर पाकिस्तानच्या आग्रहानंतर काश्मीरमध्ये 'तिसऱ्या देशाचं' सैन्य घुसू शकतं."
ग्लोबल टाइम्समध्ये चीनच्या वेस्ट नॉर्मल यूनिव्हर्सिटीमधील भारताच्या अध्ययन विभागाचे प्राध्यापक आणि व्यवस्थापक लॉन्ग शिंगचून यांनी लिहिलं आहे की, "जर भूतानने भारताची मदत मागितली आहे, तर ती मदत केवळ निर्धारित सीमेपर्यंत मर्यादित राहायला हवी. भूतानच्या मदतीच्या नावावर भारताने चीनच्या डोकलाम परिसरात घुसखोरी केली आहे."
या तर्कावर भारत आणि पाकिस्तानमधील वादग्रस्त काश्मीरमध्ये तिसऱ्या देशाचं सैन्य घुसू शकतं. भारत कायमच आंतरराष्ट्रीय समानता आणि देशांतर्गत प्रकरणात दखल देऊ नये असं बोलत असतो. पण दक्षिण आशियात भारताने चतुराईने वर्चस्व प्रस्थापित केलं आह, जे संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचं उल्लंघन आहे.
सिक्कीममधील भारतीय परिसर डोकाला लागूनच भूतानचा डोकलाम परिसर आहे. भूतानचा डोकलाम हा आपलाच डोंगलांग भाग असल्याचा दावा चीन करत आहे. भारत आणि चीनमध्ये 3488 किलोमीटरची सीमा आहे, तर 220 किलोमीटरची मोठी सीमा सिक्कीममध्ये आहे.
चीनने सह जूनला सिक्कीममधील भारतीय सैन्याच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या. भूतानच्या डोकलाम खोऱ्यात सैन्याचे टँक आणि इतर जड वाहनांच्या दळणवळणासाठी चीनला रस्ता बनवायचा आहे, ज्याला भारत विरोध करत आहे. मागील एक महिन्यापासून सिक्किममधील भारत-चीन सीमेवर तणाव आहे. ज्या परिसरात वाद झाला आहे, तिथे भारत, भूतान आणि तिबेटची सीमा आहेत. रस्ता बनवण्याच्या चीनच्या निर्णयाचा भूतानने अधिकृतरित्या विरोध केला आहे.
सीमेवर झालेल्या वादानंतर भारत आणि चीनने डोकलाम परिसरात अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आलं आहे.
मागील काही काळापासून हिंदी महासागर आणि अॅडनच्या आखातात चीनने युद्धनौकांच्या संख्येत वाढ केली आहे. एका अहवालानुसार, हिंदी महासागरात चीनने भारताच्या चौपट युद्धनौका तैनात केल्या आहेत.
तर दुसरीकडे भारत आज (10 जुलै) जपान आणि अमेरिकेसोबत पूर्वनियोजित संयुक्त नौदल अभ्यास करणार आहे.
संबंधित बातम्या
चिनी दूतावासाकडून भारतात येणाऱ्या नागरिकांसाठी 'ट्रॅव्हल अलर्ट' जारी
G-20 : मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट, डोकलाम प्रश्नावरही चर्चा : सूत्र
चीनच्या ‘ड्रॅगन’वर भारताच्या ‘रुक्मिणी’ची नजर
सिक्कीममधून भारताने सैन्य हटवावं, चीनच्या उलट्या बोंबा
...अन्यथा 1962 पेक्षा गंभीर परिणाम भोगावे लागतील, चिनी मीडियाची पुन्हा धमकी
हिंदी महासागरात चीनच्या कुरापती, युद्धनौका तैनात