मेक्सिको : मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीमध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असून, या भूकंपात प्रचंड नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत या भूकंपात 248 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनातर्फे बचावकार्य युद्धपातळीवर सुरु करण्यात आलं आहे.


भारतीय वेळेनुसार रात्री 11. 45 वाजता हा प्रलंयकारी भूकंप झाला. या भूकंपामुळे तब्बल 44 इमारती जमीनदोस्त झाल्याचं मेक्सिकोच्या गव्हर्नरांनी सांगितलं. भूकंपाचा केंद्रबिंदू मेक्सिकोपासून प्यूब्ला राज्यातील चियाउतला डी तापियापासून सात किलोमीटर पश्चिमेला होता.



या भूकंपानंतर मेक्सिको शहर विमानतळावरील सर्व विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर सर्वाधिक नुकसान झालेल्या भागात अनेक स्वयंसेवी संघटना, प्रशासनाकडून बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असल्याची भीती मेक्सिकोच्या गव्हर्नरांनी व्यक्त केली आहे. या भूकंपानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करुन शोक व्यक्त केला आहे.


दरम्यान, यापूर्वी 1985 साली असाच भूकंप झाला होता. या ज्यात जवळपास 90 जणांचा मृत्यू झाला होता.