ऑर्सा (पोलंड): अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोलंड दौऱ्यातील एक व्हिडीओची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. पोलंडच्या फर्स्ट लेडी अगाता डूडा यांच्याशी हात मिळवण्यासाठी ट्रम्प यांनी हात पुढेही केला पण त्याच वेळी अगाता यांनी ट्रम्प यांच्याशी हात न मिळवता त्यांच्या पत्नी मेलानिया यांना शेकहॅण्ड केलं. आणि हाच क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात बराच व्हायरल झाला आहे.


सुरुवातील पोलंडचे राष्ट्राध्यक्ष अँड्रेज डूडा यांनी शेकहॅण्ड करत ट्रम्प यांचे स्वागत केलं. नंतर पोलंडच्या फर्स्ट लेडी अगाता यांना ट्रम्प यांचं स्वागत करायचं होतं. जेव्हा ट्रम्प यांनी अगाता यांना शेकहॅण्ड करण्यासाठी हात पुढे केला तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करत त्या मेलानिया यांच्याशी हात मिळवायला पुढे गेल्या. या अनपेक्षित प्रकारानं ट्रम्प हे देखील जरासे भांबावले. पण त्यानंतर अगाता यांनी तात्काळ ट्रम्प यांच्याशी शेकहॅण्ड केलं.

ट्रम्प जेव्हा पोलंड दौऱ्यावरुन परतत होते त्यावेळेसचा हा व्हिडीओ आहे.  त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच शेअर होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी त्यांचा व्हिडीओ पाहिला आहे. दरम्यान, यानंतर पोलंडच्या राष्ट्रध्यक्षांनी याबाबत स्पष्टीकरणही दिलं. फर्स्ट लेडी अगाता यांनी हे मुद्दामहून केलं नाही तर ही अनावधानानं झालेली चूक आहे.



ट्रम्प यांचा अशापद्धतीचा व्हिडिओ पहिल्यांदाच व्हायरल झालेला नाही. याआधीही जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि ट्रम्प यांचा असाच व्हिडिओ शेअर झाला होता. तर काहीच दिवसांपूर्वी ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांनी हात झटकल्याचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल झाला होता.