‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’सारख्या दहशतवादी संघटना जगासाठी घातक आहेत. त्यामुळे जी-20 देशांनी दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचं आवाहनही मोदींनी केलं.
इंटरनेट, सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना दहशतवादाकडे खेचलं जात आहे, असे सांगत मोदींनी स्थितीचं गांभिर्य लक्षात आणून दिलं. यावेळी मोदींनी दहशतवादाविरोधात लढण्यासाठी ‘10 पॉईंट्स अॅक्शन प्लॅन’ही मांडला. सगळ्या देशांनी दहशतवादाच्या विरोधात एकत्रित लढा दिला पाहिजे, अशी भूमिका यावेळी मोदींनी मांडली.
दहशतवादाविरोधात काय आहे मोदींचा ‘10 पॉईंट्स अॅक्शन प्लॅन’?
- दहशतवादाला समर्थन देणाऱ्या देशांवर कठोर कारवाई करावी. किंबहुना, अशा देशांना जी-20 मध्ये सहभागी होण्यास बंदी आणावी.
- संशयित दहशतवाद्यांची यादी जी-20 देशांनी एकमेकांना देणं गरजेचं आहे. त्यानंतर दहशतवादी आणि त्यांना समर्थन देणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी.
- दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्वच देशांनी एकमेकांना सहकार्य करायला हवं. शिवाय, दहशतवाद्यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया अधिक सोपी करण्याची गरजही आहे.
- संयुक्त राष्ट्र संघाने सूचवलेल्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी व्हावी.
- धर्माच्या नावावर दुही माजवणाऱ्यांविरोधात जी-20 देशांमध्ये वैचारिक देवाण-घेवाण व्हावी.
- दहशतवाद्यांची आर्थिक मदत रोखणं गरजेचं असून, त्यासाठी आवश्यक कारवाई करावी.
- दहशतवाद्यांना शस्त्र आणि स्फोटकं पुरवणाऱ्यांवर आणि खरेदी-विक्रीवर कारवाईसाठी टास्क फोर्सची स्थापना करावी.
- सर्वच देशांनी दहशतवादी संघटनांना पाठबळ देणं बंद करायला हवं.
- सायबर सुरक्षा महत्त्वाची असून, त्यासाठी जी-20 देशांनी पुढाकार घेतला पाहिजे.
- दहशतवादाविरोधात लढण्यासाठी जी-20 देशांमध्ये सुरक्षा सल्लागारांची नेमणूक करावी.